वायू या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून आता नैर्ऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे असे रविवारी हवामान विभागाने सांगितले. येत्या २ -३ दिवसांत मोसमी पावसाची प्रगती होणार असून आतापर्यंत देशात पावसाची ४३ टक्के तूट नोंदण्यात आली आहे.

आतापर्यंत मोसमी पाऊस हा मध्य भारतात येणे अपेक्षित असताना तो अजून महाराष्ट्रातही पोहोचलेला नाही. एरवी या काळात मोसमी पाऊस मध्य प्रदेश, राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश व गुजरातपर्यंत पोहोचलेला असतो. वादळाची तीव्रता कमी झाल्याने आता मोसमी पावसाची प्रगती सुरू झाली आहे.  मोसमी पाऊस सध्या मंगलोर, म्हैसूर, कडलोर या दक्षिण द्वीपकल्पात तसेच पासीघाट, आगरतळा या ईशान्येकडील भागात आहे. महाराष्ट्र ते गुजरात या पश्चिम किनारी भागात पाऊस पडत असला तरी तो वादळामुळे पडत आहे. मोसमी पाऊस  ८ जूनला केरळात आला असून तो एरवी १ जूनला केरळात येत असतो पण यावेळी आठवडाभर विलंब झाला आहे.

भारतीय हवामान खात्याचे अतिरिक्त संचालक देवेंद्र प्रधान यांनी सांगितले की, मोसमी पावसाची प्रगती वायू चक्रीवादळामुळे खुंटली होती. त्याची तीव्रता आता कमी झाली असून दोन तीन दिवसात मोसमी पावसाची प्रगती होईल. मोसमी पावसाच्या प्रगतीस अनुकूल स्थिती असून तो मध्य अरबी समुद्र, कर्नाटक व तामिळनाडूच्या इतर भागांत पसरेल.

महाराष्ट्रात ५९ टक्के तूट

मोसमी पावसाची प्रगती खुंटल्याने देशात पावसाची ४३ टक्के तूट दिसून आली आहे. मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र व गोवा या राज्यांत पावसाची तूट ५९ टक्के असून पूर्व व ईशान्य भारतात ती ४७ टक्के आहे.  पावसाची तूट उपविभागांचा विचार करता पश्चिम व पूर्व मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड येथे अनुक्रमे ७५, ७० व ७२ टक्के आहे. विदर्भात पावसाची तूट ८७ टक्के आहे. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतातील राज्ये व महाराष्ट्रात धरणांमधील पाण्याचा साठा गेल्या दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. बिहार, झारखंड, ओदिशा या राज्यांमध्ये उष्मा लाटांची  पातळी वाढली आहे.