सर्व देशवासिय ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत तो मान्सून केरळात दाखल होण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ लागणार आहे. हवामान विभागाने मंगळवारी वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे येत्या गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकेल. हवामान विभागाने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजामध्ये सात जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविली होती. पण विविध कारणांमुळे मान्सूनचे भारतातील आगमन आणखी दोन दिवस लांबणीवर पडले आहे. हवामान विभागाचे संचालक के. बालचंद्रन यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
दरम्यान, पुढील २४ तासांत तामिळनाडूच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. अंदमानातील पाऊस शुक्रवारीच पुढे सरकला असला तरी तो अजून केरळपर्यंत पोहोचलेला नाही. सध्या केरळमध्ये ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत.