देशात सलग तिसऱ्या दिवशी नव्या करोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये १४ हजार ५१६ रुग्णांची भर पडली असून त्याआधी दोन दिवस १२ हजार ८८१ आणि १३ हजार ५८६ रुग्णांची वाढ झाली होती.

देशभरातील करोना रुग्णांची संख्या ३ लाख ९५ हजार ४८ झाली आहे. त्यापैकी २ लाख १३ हजार ८३१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ९१२० रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ५४.१३ टक्कय़ांवर पोहोचले आहे. १ लाख ६८ हजार २६९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. एकूण मृत्यू १२ हजार ९४८ झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला.

चोवीस तासांमध्ये १ लाख ८९ हजार ९६९ इतक्या सर्वाधिक नमुना चाचण्या केल्या गेल्या असून बाधितांचे प्रमाण ७.६४ टक्के आहे. आतापर्यंत ६६ लाख १६ हजार ४९६ नमुना चाचण्या झाल्या आहेत. दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ५३ हजार ११६ झाली असून चोवीस तासांमध्ये ३ हजार १३७ रुग्णांची वाढ झाली.

* मुंबईत शनिवारी एक हजार १९७ नवे रुग्ण आढळून आले. एकूण करोनाबाधितांची संख्या ६५ हजारांवर पोहोचली असून, गेल्या २४ तासांत १३६ मृत्यूंची नोंद झाली.
* मोठय़ा संख्येने खाटा उपलब्ध करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.

* मुंबईमध्ये १६ ते १९ जूनदरम्यान ७५, तर १६ जूनपूर्वी ६१ अशा एकूण १३६ जणांचा मृत्यू झाला होता. या सर्वाचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे पालिकेला गेल्या ४८ तासांमध्ये हाती आलेल्या कागदपत्रांवरून उघड झाले.

* या १३६ जणांमध्ये ९४ पुरुष, तर ४२ महिलांचा समावेश होता. तसेच नऊ जण ४० वर्षांखालील, ७६ जण ६० वर्षांवरील, तर ५१ जणांचे वय ४० ते ६० वर्षांदरम्यान होते.

* आतापर्यंत मुंबईतील मृतांची संख्या तीन हजार ५५९ झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी ८०१ करोना संशयितांना दाखल करण्यात आले.

* करोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केलेल्या ६१० व्यक्ती शनिवारी बऱ्या झाल्या असून त्यांना रुग्णालयांतून घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत ३२ हजार ८६७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.