गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

१९ जुलै ते ४ ऑगस्ट या १७ दिवसांपैकी १५ दिवस करोनारुग्णांची दैनंदिन वाढ ४० हजारांहून अधिक राहिलेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही मोठी राज्येच नव्हे तर छोटय़ा राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत. गोवा सात हजार, त्रिपुरा ५.५ हजार, मणिपूर तीन हजार, नागालँड २५००, पुडुचेरी या राज्यांमध्ये चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मेघालय, सिक्कीम, अंदमान-निकोबार या तीनच राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.

देशभरात करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६७.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्युदर २.०९ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये सहा लाख १९ हजार ६५२ नमुना चाचण्या केल्या गेल्या. सलग दुसऱ्या दिवशी सहा लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. एकूण २.१४ कोटी चाचण्या झाल्या आहेत. देशभरात १३६६ वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून १८ हजार फूट उंचीवर लेहमध्येही प्रयोगशाळा उभारण्यात आली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेतर्फे देण्यात आली.