सैन्य दलातील (सीएमपी) जवानांच्या रिक्त असलेल्या 100 पदांसाठी तब्बल 2 लाख महिलांनी ऑनलाइन अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी सशस्त्र दलात महिलांचा समावेश केवळ अधिकारी वर्ग म्हणून केला जात होता. तसेच त्यांना पाणबुड्या आणि युद्धनौकांमध्ये सेवा बजावण्याची संधी देण्यात येत नव्हती. सैन्या दलाने पहिल्यांदाच एक ‘महिला प्रोवोस्ट युनिट’ तयार करण्यावर विचार सुरू केला आहे. यामध्ये दोन अधिकारी, तीन ज्युनिअर कमिशन अधिकारी आणि 40 सैनिक असणार आहेत. ही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 8 जून पर्यंत सुरू राहणार आहे.

‘सीएमपी’मध्ये सैनिक म्हणून महिलांची होणारी भर्ती हे उचलण्यात आलेले मोठे पाऊल आहे. 25 एप्रिलपासून या अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल 2 लाख महिलांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. या महिन्याच्या अखेरिस बेळगावमध्ये भर्ती प्रक्रिया पार पडणार आहे. पुढील 17 वर्षांमध्ये सैन्य दलात 1 हजार 700 महिलांना सामिल करून घेण्याची योजना तयार करण्यात आली आहे. याअंतर्गत दरवर्षी 100 महिलांना सैन्यदलात सामावून घेतले जाणार असल्याची माहिती सैन्य दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, महिला जवानांना प्रशिक्षण दिल्यानंतर जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व क्षेत्रांमध्ये जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच महिला आंदोलकांना रोखण्यासाठी तैनात केले जाणार आहे. याव्यतिरिक्त बलात्कार आणि छेडछाडीसारख्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सीएमपी महिला जवान मदत करणार असल्याची माहिती एका अन्य अधिकाऱ्याने दिली. ज्यांना सैन्यदालात लढण्यासाठी जायचे आहे, अशा महिलांना लढाऊ जवानांच्या भूमिकेतही देशसेवा करण्याची संधी देण्यात यावी, असे मत एका महिला अधिकाऱ्याने व्यक्त केले.