टाळेबंदीच्या आणखी शिथिल केलेल्या पाचव्या टप्प्यात पहिल्यांदाच एकादिवसामध्ये करोनाचे रुग्ण नऊ हजारहून अधिक संख्येने वाढले. गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ९,३०४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या २ लाख १६ हजार ९१९ इतकी झाली आहे. सर्वाधिक करोना रुग्णांच्या संख्या क्रमांकात भारत जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासांमध्ये ३,८०४ रुग्ण बरे झाले असून हे बरे होण्याचे प्रमाण ४७.९९ टक्के आहे. सध्या १ लाख ६ हजार ७३७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर, १ लाख ४ हजार १०६ रुग्ण बरे झाले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आसीएमआर) प्रतिदिन नमुना चाचण्यांची क्षमता वाढवली असून ४९८ सरकारी तर, २१२ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये नमुना चाचण्या केल्या जात आहेत. आत्तापर्यंत ४२ लाख ४२ हजार ७१८ नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्ली या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांत सर्वाधिक वाढ होत असली तरी बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, नागालँड, मिझोराम आणि सिक्कीम या राज्यांमध्ये आता करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’च्या वापरासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या रुग्णांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’च्या गोळ्या देऊ नये, असा आदेश काढला होता. मात्र, या निर्णयात करून संशोधन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईपेक्षा दिल्लीत रुग्णवाढ जास्त

दिल्लीत एकादिवसामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत पहिल्यांदाच मुंबईपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत १,२७६ नव्या रुग्णांची भर पडली तर दिल्लीमध्ये ही संख्या १,५१३ इतकी होती. गेल्या आठवडय़ात दिल्लीत सातत्याने प्रतिदिन एक हजार रुग्णांची वाढ होत आहे. त्याआधी प्रतिदिन वाढ सुमारे ८०० रुग्णांपर्यंत मर्यादित होती. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या २३ हजार ६४५ झाली असून त्यापैकी ९,५४२ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीतील वाढत्या रुग्णसंख्येबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी गुरुवारी नायब राज्यपाल अनिल बैजल आणि आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांच्याशी चर्चा केली. दिल्लीत नमुना चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना हर्षवर्धन यांनी केली आहे. ‘एम्स’ रुग्णालयाच्या डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य सेवकांना करोनाचा फटका बसला असून ३० मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, २०६ आरोग्य सेवकांना करोनाची बाधा झाली होती. त्यातील बहुतांश बरे झाले असून त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली आहे.