सीरियातील संघर्षांमुळे किमान १ लाख २० हजार लोकांनी स्थलांतर केले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मानवतावादी कामकाज समन्वयासाठीच्या कार्यालयाने सांगितले, की अलेप्पो, हमा व इदलिब येथून ५ ते २२ ऑक्टोबर या काळात मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झाले आहे.

संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफनी दुजारिक यांनी सांगितले, की अनेक जण अलेप्पोजवळच्या छावण्यांकडे पळाले तर विस्थापितांना तंबू, अन्न, पाणी व इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कार्य संस्थेने तयार अन्नाचा पुरवठा केला आहे. नॉर्वेच्या शरणार्थी मंडळाने दिलेल्या अहवालाशी संयुक्त राष्ट्रांचा अहवाला मिळता जुळता असून त्या संस्थेने गेल्या तीन आठवडय़ात १ लाख सीरियन लोकांनी स्थलांतर केल्याचे म्हटले आहे. मंडळाने म्हटले आहे, की देशातील शिबिरार्थी छावण्यात गर्दी झाली असल्याने ते विस्थापित झाले असून अलेप्पो येथे रशियाचे हल्ले झाल्याने विस्थापितांचे प्रमाण वाढले आहे. हमा व होम्स येथे हवाई हल्ले झाले असून मदत मिळत नसल्याने स्थलांतर झाले आहे, असे कार्ल शेमबरी यांनी सांगितले. जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अलेप्पोजवळच्या दोन खेडय़ातून ३५ हजार लोक विस्थापित झाले आहे. यादवी युद्धाचे हे पाचवे वर्ष असून अडीच लाख लोक त्यात मारले गेले आहेत.