कट्टरपंथीय इस्लामिक अतिरेक्यांविरोधात अमेरिकेने इराकी फौजांसह केलेल्या संयुक्त कारवाईत अत्यंत महत्त्वाचे मोसुल धरण दहशतवाद्यांकडून परत मिळविण्यात इराकी सैन्यास यश आले आहे. अमेरिकेने ‘आयएसआयएस’ दहशतवाद्यांवर रविवारी तुफानी हवाई हल्ले चढविले. या हल्ल्यांमुळे दहशतवाद्यांच्या ताब्यातील काही प्रदेश परत मिळत असले, तरी कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागत असल्याची माहिती इराकमधील कुर्दी अधिकाऱ्यांनी दिली.
कट्टरपंथीय इस्लामी दहशवाद्यांना वेळीच आवर घातला नाही तर त्यांचे हे लोण भूमध्य समुद्राकडून ब्रिटनच्या रस्त्यांवर पसरायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच स्वसंरक्षणार्थ इराकमधील ‘आयएसआयएस’ दहशतवाद्यांविरोधात लष्करी बळाचा वापर करायला ब्रिटन मागे-पुढे पाहणार नाही, अशा शब्दात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘द संडे टेलिग्राफ’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या एका लेखात कॅमेरून यांनी इस्लामी राष्ट्राची उग्र मागणी करणाऱ्या ‘आयएसआयएस’चा बीमोड करण्यासाठी राजनीती, लष्करी बळ आणि आर्थिक व शस्त्र सहकार्य अशा सर्व मार्गाचा वापर करण्याची गरज असल्याचे नमूद केले.