करोनामुळे देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. रोजच करोना रुग्ण वाढीचा नकोसा विक्रम प्रस्थापित होत आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असलेल्या नेहरू स्टेडियममध्ये १ हजार खाटांचं कोविड सेंटर सुरु करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कोविड सेंटरमध्ये योगापासून टीव्हीवर रामायण दाखवण्याची सोय करण्यात आली आहे.

कोविड सेंटरमध्ये मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. त्याच्यावर रामायण आणि महाभारत या मालिका दाखवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आमि गायत्री मंत्र जप चालणार आहे. तसेच या सेंटरमध्ये वेगवेगळे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. त्या प्रत्येक वॉर्डला स्वातंत्र्य सैनिक आणि महापुरुषांची नावे देण्यात आली आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, अब्दुल कलाम, सरदार पटेल, राजा भोज, राणी लक्ष्मीबाई, राणी कमलापती अशी नावं वॉर्डला देण्यात आली आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये ३५ ते ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोविड सेंटर गरीब लोकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलं आहे.. करोनाबाधित झाल्यानंतर त्यांना एकाच घरात राहणं कठीण होतं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला करोनाची लागण होण्याची शक्यता असते. सध्या करोना रुग्णांची होणारी वाढ पाहता हे कोविड सेंटर आवश्यक आहे. प्रत्येक खाटेवर मोबाईल चार्जिंग पॉईंट आणि पाणी गरम करण्याची सोय आहे. तसेच श्वास घेण्यास त्रास होण्याऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची सेवा पुरवली जाणार आहे.

‘ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात, मात्र…’ ओवैसींचे मोदींवर टीकास्त्र!

भोपाळ भाजपा विंग आणि माधव सेवा केंद्र यांनी मिळून हे क्वारंटाइन सेंटर उभारलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कोविड सेंटरचं लोकार्पण केलं आहे.