अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी कोलकाता पोलिसांकडे मदत मागितली आहे. एका व्हिडीओ चॅट अॅपने परवानगी न घेता आपला फोटो वापरल्याने नुसरत जहाँ यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. अॅपने ऑनलाइन प्रमोशनसाठी नुसरत जहाँ यांचा फोटो वापरला होता.

नुसरत जहाँ यांनी ट्विट करत कोलकाताचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांना टॅग केलं आहे. ट्विटमध्ये नुसरत जहाँ यांनी जाहिरातीचा स्क्रिनशॉट शेअर केला असून आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “परवानगी न घेता फोटो वापरणं स्वीकारलं जाऊ शकत नाही. कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलकडे या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी विनंती करणार आहोत. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण तयार आहोत”.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सायबर सेलने याप्रकरणी तपास सुरु केला असल्याचं सांगितलं आहे.