सत्ताधारी भाजपाच्या विरोधात सर्व विरोधकांच्या वतीने प्रजासत्ताकदिनी मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, सीताराम येचुरी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी दिग्गज नेतेमंडळी या रॅलीत सहभागी झाली.

देशातील राज्यघटना बदलण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे विधान आणि गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना या पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रजासत्ताक दिनी मुंबईत संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले. ओव्हल मैदानासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते गेट वे ऑफ इंडियासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या पदयात्रेचे संयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राहुल गांधींचे निकटवर्तीय खासदार राजू सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय हार्दिक पटेल, शरद यादव, ओमर अब्दुल्ला,  सीताराम येचुरी यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही रॅलीत सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरहेडवर दिनद्याल उपाध्याय यांचे छायाचित्र आहे. एकीकडे भाजप नेते तिरंगा रॅली काढत आहे. दुसरीकडे लेटरहेडवर दिनद्याल उपाध्याय यांचे छायाचित्र वापरायचे. मुख्यमंत्र्यांनी ते कोणत्या विचारधारेचे समर्थन करतात हे आता स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केले.

रॅलीत सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असले तरी ही अराजकीय रॅली असेल. यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले होते. गेट वे ऑफ इंडियाजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीत कोणतेही भाषण केले जाणार नाही, असे सांगितले जाते.