मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ७४ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा अदानी ग्रुपचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील जीव्हीके कंपनीसोबत करार करण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे अदानी ग्रुपने सोमवारी सांगितले. त्यामुळे या करारानंतर मुंबई विमानतळाची देखभाल आणि हाताळणीची धुरा आता अदानी ग्रुपकडे असणार आहे. हे विमानतळ देशातील दुसरं सर्वात व्यस्त विमानतळ आहे. या व्यवहारासंदर्भात अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी ट्विट करीत आनंद व्यक्त केला आहे.

गौतम अदानी म्हणाले, “मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. आपल्या ग्रहावरील महान महानगरांपैकी असलेल्या या शहरातील हवाई प्रवाशांची सेवा करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी एक विशेष बाब आहे. भारतीय विमानतळ क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जद्वारे जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्सचे कर्ज संपादन करण्याचा करार केला असल्याचे अदानी एन्टरप्राईझने म्हटले आहे. जीव्हीके ग्रुपचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडमध्ये (MIAL) ५०.५० टक्के भागभांडवल आहे. अदानी समुहासोबतच्या करारानंतर जीव्हीकेचं कर्ज हे भागभांडवलात रुपांतरित होणार आहे. मात्र, या दोन्ही उद्योगांनी त्यांच्यामधील कराराबाबत झालेली आर्थिक माहिती उघड केलेली नाही.

“अदानी ग्रुप एसीएसए (एअरपोर्ट कंपनी ऑफ साउथ आफ्रिका) आणि एमआयएएल (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडमध्ये) मधील २३.५० टक्के समभाग संपादन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी भारतीय स्पर्धा आयोगाची मान्यता मिळविली आहे”, अशी माहिती अदानी ग्रुपकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जीव्हीकेच्या ५०.५० भागभांडवलासह अदानी ग्रुपचा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एकूण मालकीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तो ७४ टक्के होईल.