डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याच्याविरोधातील दोन हत्येच्या खटल्यांचा निकाल आज जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर चंदीगढ येथील विशेष सीबीआय न्यायालय आणि विभागीय मुख्यालयाभोवतीच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयात ही सुनावणी होईल. राम रहीमवर डेरा सच्चा सौदामधील व्यवस्थापक रंजीत सिंह आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती जगदीप सिंह यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. यापूर्वी २५ ऑगस्टला त्यांनीच राम रहिमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत २० वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर ते आज पुन्हा बाबा राम रहीमच्या विरोधातील हत्येच्या खटल्याचा निकाल देतील. बाबा राम रहीमला सध्या रोहतक येथील तुरूंगात ठेवण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी न्यायालयात केवळ सीबीआयचे वकील, कर्मचारी आणि बचावपक्षाच्या वकिलांनाच न्यायालयात प्रवेश करता येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, ओळखपत्र दाखवल्याशिवाय कुणालाही न्यायालयाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव लावलेल्या बॅरिकेडसमुळे वाहतुकीचा वेग मंदावणार आहे.
यापूर्वी २५ ऑगस्टला बाबा राम रहीमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांनी हिंसाचार घडवला होता. यात ३८ जणांचा मृत्यू झाला होता. तर २५० हून अधिक जखमी झाले होते. निकालानंतर डेरा सच्चा सौदाचे समर्थक आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बाबा राम रहिमला न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट रचला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. या ठिकाणी हिंसाचार घडवून आणण्यासाठी ‘डेरा’ने ५ कोटी रुपये वाटल्याची माहिती एसआयटीच्या चौकशीतून समोर आली होती. पंचकुलातील ‘डेरा’चा प्रमुख पदाधिकारी चमकौर सिंग हा हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक होता. हिंसाचारानंतर चमकौर त्याच्या कुटुंबासह पळून गेला. त्याच्या अटकेनंतरच अधिक माहिती उघड होईल, असे तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते.