रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूझ यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जोरदार हल्ला चढविला. अमेरिकेतील मुस्लीम हे आयसिसविरोधातील लढय़ात अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे ओबामा म्हणाले. या समाजावर डाग लावण्याचा प्रयत्न केल्यास तो सहन केला जाणार नाही, असेही ओबामा यांनी स्पष्ट केले.
आयसिसचा द्वेषमूलक आणि हिंसक प्रचार याविरुद्धचा लढा जिंकण्याचा आपला निर्धार आहे आणि त्यासाठी अमेरिकेतील मुस्लीम हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, असे ओबामा यांनी नभोवाणीवरून आणि वेबवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणांत म्हटले आहे.
अमेरिकेतील मुस्लीम हे आयसिसविरोधातील लढय़ात अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याने आणि देशाच्या उभारणीत आणि जीवनशैलीत त्यांचाही सहभाग असल्याने त्यांच्यावर कलंक लावण्याचा प्रयत्न केल्यास तो सहन केला जाणार नाही, असेही ओबामा म्हणाले.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूझ यांनी अलीकडेच मुस्लीमविरोधी वक्तव्य केले होते त्याचा संदर्भ देऊन ओबामा बोलत होते.
शेजारी मुस्लीम देशांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन क्रूझ यांनी ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर केले होते. तर मुस्लिमांना देशात तात्पुरत्या स्वरूपाची प्रवेशबंदी करावी, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. सदर दोघांचे हे वक्तव्य आपले चारित्र्य, मूल्ये आणि इतिहास यांच्या विरोधातील आहे कारण धार्मिक स्वातंत्र्यावरच देशाची उभारणी झाली आहे, असे ओबामा म्हणाले.
ब्रसेल्सवरील हल्ल्याच्या संदर्भात ओबामा म्हणाले की, बेल्जियम हा अमेरिकेचा मित्र आहे आणि मित्रावर संकट आले तर अमेरिका त्याच्या पाठीशी आहे, आयसिसच्या मुळाशी जाऊन त्यांचा नि:पात करण्याचा निर्धार ओबामा यांनी व्यक्त केला.