पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र काढल्याच्या वादातून एका मुस्लिम महिलेला तिच्या सासरच्यांनी घरातून हाकलून दिले आहे. एवढेच नाही तर तिची हकालपट्टी करण्याआधी तिच्या पतीने आणि सासरच्यांनी तिला मारहाणही केली आहे.

उत्तर प्रदेशातील बसारिकपूर या ठिकाणी एका मुस्लिम कुटुंबात ही घटना घडली आहे. या महिलेचा पती इतका चिडला आहे की या महिलेला तलाक न देताच त्याला दुसरे लग्न करायचे आहे, अशीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता पीडित महिलेने सिकंदरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नगमा परवीन असे या पीडित महिलेचे नाव असल्याची माहितीही समोर येते आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगमा परवीन आणि परवेझ खान या दोघांचे लग्न नोव्हेंबर २०१६ मध्ये झाले होते. नगमाला चित्र काढण्याची आवड आहे, त्यामुळेच तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र काढले.

नगमा कोणते चित्र काढते आहे हे तिच्या घरी माहित नव्हते. मात्र या दोघांचे चित्र काढून झाल्यावर तिने तिचा पती परवेझला ते दाखवले. या घटनेमुळे परवेझ इतका चिडला की त्याने आपल्या घरातल्या लोकांना सोबत घेतले आणि नगमाला जबर मारहाण केली. एवढेच नाही तर तुला वेड लागले आहे असे सांगत तिला तिच्या माहेरी जाण्यास सांगून घरातून हाकलून दिले. या सगळ्या प्रकारामुळे धक्का बसलेल्या नगमाने आता तिचा पती परवेझ आणि सासरच्या इतर मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.