उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यावर मोठं नैसर्गिक संकट ओढवलं. रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी हिमकडा कोसळल्यानं मोठी हानी झाली आहे. धरणाचं नुकसान झालं असून, ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पालाही मोठा फटका बसला आहे. महत्त्वाचं म्हणजे धौलीगंगेवरील सीमेकडील रस्त्यांना जोडणारा पूल वाहून गेल्यानं लष्काराचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे जवानांना सध्या जोशी मठाकडे पाठवण्यात आलं आहे.

उत्तराखंडमधील रैनी, अलकनंदा या परिसरात मोठा हाहाकार उडाला आहे. उत्तराखंडमध्ये २०१३ साली आलेल्या प्रलयाची आठवण करून देणारं नैसर्गिक संकट या परिसरात कोसळलं आहे. रविवारी नंदादेवी ग्लेशियरचा कडा कोसळल्यानं धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांना पुर आला. पाण्याच्या तडाख्यात ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर दोन पुलही तुटले आहेत. यातील लष्कराला सीमाभागाशी जोडणारा पुलही वाहून गेला आहे.

सीमाभागातील मलारीला जोडणारा पुल हिमकडा कोसळल्यानं वाहून गेला आहे. हा पुल लष्काराला सीमाभागांशी जोडतो. पूल वाहून गेल्यामुळे लष्कराने आयटीबीपीच्या २०० जवानांना जोशी मठात पाठवलं आहे. तर आटीबीपीची एक टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. पूल बनवणारं लष्कराचं पथकही पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे. या सर्व परिस्थितीवर गृहमंत्रालयाकडून नजर ठेवली जात असून, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावतही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हिमकडा कोसळल्यानंतर निर्माण झालेल्या जलप्रलयाचा नदीकाठांवरील गावांना मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून, ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टची मोठी हानी झाली आहे. सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्यांना मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आलं असून, हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं काठावर असलेल्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.