सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे युद्ध चांगलेच पेटले आहे. मध्य प्रदेशमधील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये अलीकडेच झालेल्या जातीय दंगलीच्या झळा बसलेल्या काही युवकांशी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने संपर्क साधल्याचे गुप्तचर यंत्रणांचा हवाला देत सांगितले आणि त्याचा ठपका भाजपवर ठेवला. लगेचच दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये झालेल्या सभेत मोदींनी ‘गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेणारा कोण हा शहजादा?’ असा खोचक सवाल केला. साहजिकच ‘शहजादा’ हा शब्द काँग्रेसला भलताच झोंबला. ‘आमचे कार्यकर्ते अशी असभ्य भाषा दोन दिवसांत थांबवू शकतात’ असा इशाराही काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींना दिला. पण रविवारी पाटण्यातील सभेत मोदींनी पुन्हा एकदा ‘शहजादा’चा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने घराणेशाहीचे राजकारण थांबविले तरच आपण राहुल यांचा उल्लेख शहजादा करणार नाही, असे ते म्हणाले. मोदी यांचा थेट इशारा काँग्रेसमधील घराणेशाहीकडे आहे, हे स्पष्ट आहेच. शहजादा हा शब्द मोगल काळात युवराजासाठी वापरला जायचा. राहुल गांधी यांना ही उपमा देत ते स्वकर्तृत्वाने नव्हे तर घराणेशाहीतून पुढे आल्याचे मोदी यांना जनतेच्या मनावर बिंबवायचे आहे. त्याच वेळी आपण टपरीवर चहा विकून पुढे आल्याचे सांगत स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. (हल्ली प्रत्येक सभेत चहाच्या टपरीचा उल्लेख मोदी मुद्दामहून करू लागले आहेत). पण ‘शहजादा’ ही उपमा देऊन धार्मिक पातळीवर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न मोदींकडून होत आहे. थोडक्यात काय, तर मोदी हे एका दगडातून दोन पक्षी मारू पाहात आहेत.