विकिलिक्सच्या कागदपत्रांतील माहिती

विकिलिक्सने अलीकडेच जाहीर केलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिलिकॉन व्हॅलीतील २०१५च्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओबामा प्रशासनाने नियोजन केले होते असे स्पष्ट झाले आहे. डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे प्रचारप्रमुख जॉन पोडेस्टा यांनी मोदी यांचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे सर्व नियोजन केले होते. मोदी यांचा कार्यक्रम सप्टेंबर २०१५ मध्ये सिलिकॉन व्हॅलीत होण्याच्या दीड महिना आधी पूर्वतयारी करण्यात आली होती, त्या वेळी दक्षिण व मध्य आशिया कामकाजमंत्री निशा बिस्वाल यांनी जॉन पोडेस्टा यांना एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांचा सल्ला मागितला होता व मोदी यांचा दौरा यशस्वी कसा करता येईल, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन हे स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमात स्टॅनफोर्ड येथे मोदी यांच्यासमवेत सहभागी होऊ शकतील का, याचीही चाचपणी करण्यात आली होती त्या वेळी पोडेस्टा हे नुकतेच क्लिंटन यांचे प्रचारप्रमुख झाले होते.

पोडेस्टा यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये बिस्वाल यांनी म्हटले आहे, की सिलिकॉन व्हॅलीत दोन महत्त्वांच्या मुद्दय़ांवर भारत सरकारचा भर राहणार आहे व त्यात डिजिटल अर्थव्यवस्था व स्वच्छ ऊर्जा यांचा समावेश राहील. मोदी गुगल कंपनीला भेट देऊन भारतात गुंतवणूक करण्यास सांगणार आहेत. स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमास कॅबिनेट दर्जाच्या व्यक्तीने यावे असे भारतीय गटाचे म्हणणे आहे, त्यामुळे परराष्ट्रमंत्री जॉन केरी किंवा अर्नेस्ट एनर्जीच्या मोनिझ या कॅलिफोर्नियाला क्लीन एनर्जी कार्यक्रमासाठी जाऊ शकतील किंवा नाही याचा अंदाज घेतला जात आहे, पण चीनचे नेते क्षी जिनपिंग यांच्या आमसभा दौऱ्यामुळे सगळे अडचणीचे झाले असून इतर काही पर्याय आहेत का ते सुचवावे. परराष्ट्र खात्याने हा ईमेल खरा किंवा खोटा हे सांगितलेले नाही.