नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीस उपस्थित राहणाऱ्या  सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांशी नव्या पंतप्रधानांनी मंगळवारी चर्चा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद राजपक्षे, भूतानचे त्शेरिंग दोगबे, नेपाळी पंतप्रधान सुशील कोईराला, मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांशी मोदींनी चर्चा केली.
भारत आणि सर्व सार्क राष्ट्रांमधील संबंध सौहार्दतेचे रहावेत तसेच, व्यापारउदीमास चालना मिळावी अशी अपेक्षा सर्वच राष्ट्रांच्या प्रमुखांनी व्यक्त केली. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांच्याशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या हेरात येथील भारतीय दूतावासावरील हल्ल्याचा संदर्भ देत भारतीयांच्या सुरक्षेविषयी अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच अफगाणिस्तानच्या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची भारताची मनिषा अधोरेखित केली.
वर्षांअखेरीस नाटो सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत असल्याने त्याविषयी भारताची भूमिका काय होती, या पत्रकारांच्या प्रश्नास उत्तर देताना उभय राष्ट्रांमध्ये स्नेहपूर्ण संबंध राहतील आणि योग्य तो समन्वयही राखला जाईल, असे परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी सांगितले.
मोदींना आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांनी नरेंद्र मोदी यांनाही आपापल्या देशास भेट देण्याचे आमंत्रण दिले असून भारताच्या नवीन पंतप्रधानांनी ते आनंदाने स्वीकरले असल्याची माहिती परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी दिली.
मच्छिमारांचा प्रश्न
भारत आणि श्रीलंका यांच्यात मच्छिमारांना ताब्यात घेण्यावरून अनेकदा वितुष्ट येते. मात्र त्यावर मात करण्यासाठी आता या प्रश्नावर चर्चा घडावी आणि मच्छिमारांमध्येही उभयपक्षी संवाद वाढीस लागावा, यावर नरेंद्र मोदी आणि लंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांच्यात एकमत झाले.
मॉरिशसचे सहकार्य
मॉरिशस हे आता करचुकवेगिरी करणाऱ्यांसाठी नंदनवन ठरू लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर त्या राष्ट्राचे पंतप्रधान नवीन रामगुलाम् यांनी भारताला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर स्वयंचलित पद्धतीने करविषयक माहिती भारताला देण्यास हिरवा कंदील दाखविला.