दीड वर्षांत छाननी करून बुद्धिमान व तंदुरुस्त स्त्री-पुरुषांची निवड होणार
येत्या २०१७ या वर्षांत अंतराळवीर होण्यासाठी नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडे १८३०० अर्ज आले आहेत. २०१२ या वर्षांच्या तुलनेत अर्जाची संख्या तिप्पट आहे. यापूर्वी १९७८ मध्ये आठ हजार अर्ज आले होते तो विक्रम यावर्षी मोडला गेला आहे.
नासाचे प्रशासक व माजी अंतराळवीर चार्ली बोल्डन यांनी सांगितले की, मंगळाच्या प्रवासाला जाण्याची तयारी एवढय़ा मोठय़ा संख्येने अमेरिकी लोकांनी दाखवली आहे. शिवाय अर्ज करणारे लोक वेगवेगळी पाश्र्वभूमी असलेले आहेत. या अर्जातून फार थोडय़ा लोकांची प्रत्यक्षात निवड होणार आहे. पुढील दीड वर्षांत अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना टेक्सासमधील ह्यूस्टन येथे जॉनसन अवकाश केंद्रात मुलाखतीला बोलावले जाईल. सरतेशेवटी ८ ते १४ जणांनाच अंतराळ प्रवासासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. २०१७ च्या मध्यावधीत या अंतराळवीरांची यादी जाहीर केली जाणार आहे. १४ डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती त्याची मुदत गुरुवारी संपली. ज्यांची निवड होईल, त्यांना अवकाशात चालण्याचे व सांघिक कामाचे प्रशिक्षण दिले जाईल शिवाय काही प्रमाणात रशियन भाषाही शिकवली जाईल. नंतर त्यांना जॉनसन अंतराळवीर केंद्रात तांत्रिक बाबींची कामे दिली जातील. या अंतराळवीरांना नंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, ओरायन अवकाशयान किंवा स्पेसएक्सची ड्रॅगन कॅप्सूल, बोईंगची सीएसटी १०० स्टारलायनर या मोहिमात पाठवले जाईल. २०११ पासून अमेरिकेचा अवकाश उड्डाण कार्यक्रम स्पेस शटलची सेवा थांबल्याने जवळपास अडचणीत आला. सध्या नासाकडे ४७ अंतराळवीरांचा प्रशिक्षित चमू असून २००० मध्ये १४९ अंतराळवीर होते त्यावेळी स्पेस शटल मोहीम जोरात होती. नासाने अंतराळवीरांसाठी अर्ज मागवताना वैमानिक, अभियंते, वैज्ञानिक यांना प्रोत्साहन दिले होते. यात संबंधित व्यक्ती अमेरिकी नागरिक असावी, तिने अभियांत्रिकी, विज्ञान, संगणक, गणित यात पदवी घेतलेली असावी, १००० तास जेट विमान चालवण्याचा अनुभव असावा अशा अटी आहेत. याशिवाय त्यांना नासाची तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण करावी लागते. अमेरिकेच्या १९५९ मधील मक्र्युरी प्रकल्पापासून नासाने ३०० अंतराळवीरांची भरती केली आहे. बोल्डन यांनी सांगितले की, अमेरिकी भूमीवरून अवकाशात उड्डाण करण्यासाठी बुद्धिमान व तंदुरुस्त अशा स्त्री-पुरुषांची निवड केली जाईल.