गेल्या वर्षी १४ सप्टेंबरला लायगो प्रकल्पात गुरुत्वीय लहरी शोधण्यात आल्या होत्या. त्या वेळी गुरुत्वीय लहरींच्या पहिल्या थेट पुराव्यानंतर लगेच अध्र्या सेकंदाने वेगळ्याच लहरींची नोंद झाली असून ती अवकाशातील त्याच भागातून आलेल्या लहरींची आहे. या लहरी नासाच्या फर्मी दुर्बिणीने नोंदवल्या गेल्या आहेत. दोन कृष्णविवरांच्या एकमेकात विलीन होण्याने ज्या गुरुत्वीय लहरी शोधल्या गेल्या होत्या, तेथूनच उच्च ऊर्जा असलेल्या गॅमा किरणांच्या स्रोतापासून निघालेल्या वेगळ्याच लहरी फर्मी दुर्बिणीने टिपल्या आहेत असे नासाने म्हटले आहे. जर ते खरे असेल तर त्यामुळे मूलभूत भौतिकशास्त्राचे आकलन बदलणार आहे. गॅमा किरण हे कृष्णविवरांच्या विलीनीकरणातून तयार झाले व तो कृष्णविवरे शोधण्याचा एक मार्ग आहे, म्हणजे कुठलाही प्रकाश बाहेर पडत नसला, तरी गॅमा किरणांनी कृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. १४ सप्टेंबरला गुरुत्वीय लहरींची नोंद वॉिशग्टन व लुइझियाना येथील लायगो उपकरणांनी केली होती. त्यामुळे आइनस्टाइनच्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध झाले होते. १.३ अब्ज वर्षांपूर्वी दोन द्वैती कृष्णविवरांचे मीलन झाले होते, याचे पुरावे मिळाले आहेत. आता वैज्ञानिकांचे म्हणणे असे आहे, की १४ सप्टेंबरला जेव्हा गुरुत्वीय लहरींची नोंद झाली. त्या वेळी नंतर अध्र्या सेकंदाने गॅमा किरणांचा अगदी फिकट स्फोट दाखवणारे संदेश मिळाले आहेत. गुरुत्वीय लहरींनंतर मिळालेला हा संदेश योगायोग असण्याची शक्यता ०.२ टक्के आहे, एकाच ठिकाणी एकाच वेळी गुरुत्वीय लहरी संदेश व दुसरा विचित्र संदेश नोंदले गेले आहेत. गॅमा रे बर्स्ट मॉनिटर या नासाच्या फर्मी गॅमा रे स्पेस टेलिस्कोपच्या उपकरणाने गुरुत्वीय लहरींव्यतिरिक्त संदेश टिपले आहेत. १.३ अब्ज वर्षांपूर्वी कृष्णविवरांचे मीलन नेमके कुठल्या भागात झाले हे त्यावरून समजणार आहे. जीडब्ल्यू १५०९१४ गुरुत्वीय लहरी संदेश होता. लायगो वैज्ञानिकांच्या मते अमेरिकेतील दोन उपकरणांच्या टप्प्यात येणारया आकाशाच्या ६०० चौरस अंश भागाचाच यात विचार केला आहे. गॅमा किरण स्फोट या गुरुत्वीय लहरी घटनेशी संबंधित असावा याचे कारण फर्मी दुर्बिणीच्या टप्प्यात २०० चौरस अंश इतके म्हणजे लायगोच्या दोन तृतीयांश क्षेत्र येते. यात दोन शक्यता असाव्यात एकतर गॅमा किरण स्फोट हा खरोखर योगायोग असावा व त्याचा गुरुत्वीय लहरींच्या घटनेशी काही संबंध नाही किंवा कृष्णविवरे विलीन झाल्यानंतर गॅमा किरण बाहेर टाकले गेले असावेत, म्हणजे कृष्णविवरे काय व कधी गिळू शकतात याचे आकलन बदलावे लागेल. जीबीएम संशोधन पथकाचे व्हॅलेरी कॅनॉटन यांनी सांगितले, की हा शोध वेगळा आहे तो खोटा असण्याची शक्यता कमी आहे. पण तरी नियमात बदलांपर्यंत कल्पनेच्या भराऱ्या घेण्याआधी गुरुत्वीय लहरींशी संबंधित घटनातील आणखी गॅमा किरणांचे स्फोट पाहणे गरजेचे आहे. ‘द अस्ट्रोफिजिकल जर्नल’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2016 रोजी प्रकाशित
गुरुत्वीय लहरीनंतर अध्र्या सेकंदाने वेगळ्याच संदेशांची नोंद ; फर्मी दुर्बिणीच्या मदतीने संशोधन
गेल्या वर्षी १४ सप्टेंबरला लायगो प्रकल्पात गुरुत्वीय लहरी शोधण्यात आल्या होत्या.

First published on: 20-04-2016 at 02:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa has detected strange signals coming from the gravitational wave source