11 August 2020

News Flash

‘नागरिकत्व’ कायद्यावरून नसिरुद्दीन शाह संतप्त

पंतप्रधान मोदी आणि अभिनेते अनुपम खेर यांच्यावर जोरदार टीका

पंतप्रधान मोदी आणि अभिनेते अनुपम खेर यांच्यावर जोरदार टीका

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत आपला तीव्र रोष व्यक्त करीत सिनेअभिनेता आणि रंगकर्मी नसिरुद्दीन शाह यांनी ७० वर्षे या मातीत राहिल्यानंतरही मी या देशाचा नागरिक आहे, हे सिद्ध होऊ शकत नसेल तर आणखी कोणत्या पुराव्याने ते सिद्ध होईल, असा परखड सवाल केला. सध्याच्या स्थितीबाबत मी अस्वस्थ नसून मला प्रचंड चीड आली आहे, अशा शब्दांत त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणीबाबत आपली स्पष्ट मते मांडली.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसिरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेते अनुपम खेर यांच्यावर जोरदार टीका केली. नागरिकत्व कायद्याविरोधात होणाऱ्या आंदोलनापासून दूर राहणाऱ्यांविरोधात त्यांच्या रागाचा रोख होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी तसेच बुद्धिजीवी वर्गाप्रति फारच असंवेदनशीलता दाखवत असून कदाचित विद्यार्थिदशेतून गेलेले नसल्याने ते असे वागत असावेत, असा टोला त्यांनी लगावला. तर अनुपम खेर या मुद्दय़ावर फारच पुढाकार घेताना दिसत असून एनएफडीसी आणि एनएफटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असल्याच्या काळापासून अनुपम खेर हे मनोरुग्ण असल्याचे सर्वाना माहिती आहे. हा गुण त्यांच्या रक्तातच असल्याची तोफही त्यांनी डागली. ते विदूषक असून त्यांना फारसे महत्त्व दिले जाऊ नये, असेही शाह यांनी नमूद केले.

दीपिकाचे कौतुक

चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शक व कलाकार या कायद्याविरुद्ध उभे ठाकले आहेत. तारांकित कलाकार मात्र यावर मौन बाळगून आहेत. मला त्याचे आश्चर्य वाटत नाही. आपण विरोध केल्यास आपल्याला बरेच काही गमवावे लागेल, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असेल. मला या सर्वात कौतुक वाटते ते दीपिकाचे. तिने कशाचीही तमा न बाळगता जेएनयूमधील विद्यार्थ्यांची साथ दिली. विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरुद्ध ती उभी राहिली, या शब्दांत शाह यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे कौतुक केले.

जे लोक या कायद्याचे समर्थन करत आहेत त्यांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आपण कशाचे समर्थन करत आहोत, याचे भान राखले पाहिजे. आम्हाला आमची जबाबदारी काय, हे कुणी सांगण्याची गरज नाही. ती आम्हाला चांगली ठाऊक आहे. मी मुस्लीम म्हणून नाही, तर देशाचा एक समंजस नागरिक म्हणून ही भूमिका घेत आहे.

– नसिरुद्दीन शाह

अनुपम खेर यांचे प्रत्युत्तर..

नसिरुद्दीन शाह हे माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत. मी त्यांच्या कलेचा नेहमीच आदर केला आणि करत राहील, मात्र कधी कधी काही गोष्टींना उत्तरे द्यावीच लागतात. अतिशय यशस्वी आणि समाधानी करियर असूनही शाह हे नेहमीच वैफल्यग्रस्त राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यासह ज्यांच्यावर त्यांनी टीका केली ते शाह यांच्या टीकेला फारसे गांभिर्याने घेणार नाहीत. शाह यांना चांगल्या वाईटातला फरक करता येत नाही. माझ्या रक्तात फक्त हिंदुस्तान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 3:26 am

Web Title: naseeruddin shah expresses displeasure over citizenship amendment act zws 70
Next Stories
1 फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी ७ दिवसांची मुदत ठरवावी
2 भारतात नागरी स्वातंत्र्याचा संकोच!
3 काश्मीरप्रश्नी मध्यस्थीस तयार – ट्रम्प
Just Now!
X