अल काईदाशी संबंधित नुसरा आघाडी व इतर सीरियन बंडखोरांनी लष्कराच्या गस्ती नाके, पोलीस मुख्यालय व गव्हर्नर कार्यालयावर केलेल्या हल्ल्यात वायव्य सीरियात ३५ जण ठार झाले, त्यात सैनिक व बंडखोरांचा समावेश आहे. इदलिब शहरात हे हल्ले झाले असून ते आतापर्यंत सीरियन लष्कराच्या ताब्यात होते. आता झालेली धुमश्चक्री ही गंभीर स्वरूपाची होती. दोन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांचा ताबा सीरियन बंडखोरांनी घेतला होता. नुसरा आघाडीचे विरोधक असलेले इस्लामिक स्टेट समूह, सीरियन कुर्दीश योद्धे यांच्यात कोबानी हे सीमेवरील महत्त्वाचे शहर ताब्यात घेण्यासाठी जी लढाई चालू आहे त्यापेक्षा ही चकमक वेगळी होती.

कोडिनवर बंदीची मागणी
हैदराबाद- कफावरील औषधात वापरल्या जाणाऱ्या कोडिनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत. फार्मोकोव्हिजिलन्स इंडिया या संस्थेचे प्रा. के. सी. सिंगल यांनी सांगितले की, भारतातील कफ सिरपमध्ये वापरले जाणारे कोडिन सल्फेट हे वेदनाशामक असून त्याचे रूपांतर मॉर्फिनमध्ये होते. ते बाजारातून काढून घेण्याची गरज आहे. कोडिनला प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळा प्रतिसाद देते. कोडिनचे मॉर्फिनमध्ये रूपांतर झाल्याने हृदयाचा समतोल बिघडू शकतो. ज्या कफ सिरपमध्ये कोडिन असते ते नशा आणणारे व असुरक्षित असते असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विषाणूजन्य रोगांवर केरळची सज्जता
तिरूअनंतपूरम- सध्या इबोला या जीवघेण्या विषाणूच्या संसर्गाने परदेशात थैमान घातले असताना केरळात इंडियन मेडिकल असोसिएशनने विषाणूजन्य रोगांना तोंड देण्यास सज्जता सुरू केली आहे. त्याबाबत जनजागृती करण्यात आली असून डॉक्टरांनाही अद्ययावत माहिती दिली जात आहे. तातडीच्या स्थितीला कसे तोंड द्यायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. केरळ आयएमएच्या ५७ व्या राज्य परिषदेत ७ व ९ नोव्हेंबरला विषाणूजन्य रोगांवर चर्चा होईल असे आयएमएचे सचिव ए. व्ही. जयकृष्णन यांनी सांगितले. जगप्रसिद्ध विषाणूतज्ञ डॉ. रॉबर्ट गॅलो यावेळी वार्षिक परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
 
आठवडाभरात २५ बालकांचा मृत्यू
माल्डा, पश्चिम बंगाल- येथील माल्डा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणखी तीन बालकांचा अचानक मृत्यू झाला असून आठवडाभरात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक व उपप्राचार्य एम. ए. रशीद यांनी सांगितले की, कालपासून तीन बालकांचा मृत्यू झाला असून एकूण २२ बालके मरण पावली आहेत. सात दिवसात अनेक मुलांचा कमी वजन, कुपोषण, श्वासाचे आजार यामुळे मृत्यू झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राने या मुलांना गंभीर अवस्थेत माल्डा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवले होते.

इंग्लंडमध्ये चार भारतीयांचा मृत्यू
लंडन : उत्तर इंग्लंडमधील ब्रॅडफर्ड येथे भारतीय वंशाचे जोडपे व त्यांच्या दोन मुली अशा चौघांचे मृतदेह त्यांच्या घरात सापडले असे पोलिसांनी सांगितले. वेस्ट यॉर्कशायर पोलिस या घटनेची चौकशी करीत असून त्यांनी हे कुटुंब न दिसल्याच्या शेजाऱ्यांच्या माहितीनुसार तपास सुरू केला. मृतांमध्ये जतींद्र लाड (४९), त्यांची पत्नी दक्षा लाड (४४), कन्या त्रिशा (१९) व निशा (१७) यांचा समावेश आहे. काही काळ हे मृतदेह घरात पडलेले होते असा प्राथमिक अंदाज असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले.

इराकमध्ये दोन हल्ल्यांत ३८ ठार
बगदाद : इराकमध्ये दोन कारबॉम्ब हल्ल्यात ३८ जण ठार झाले. इराकी सैन्य व सरकारसमर्थक शियावादी यात प्राणास मुकले. जर्फ अल सखर येथे दहल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या हुमवी गाडय़ा तपासणी नाक्यावर घुसवल्या, त्यात २४ जण ठार तर २५ जण जखमी झाले .