पोर्तुगालमध्ये पुढील पंतप्रधानांची निवड २०१५ मध्ये होणार असून, सध्या विरोधी पक्षात असलेल्या ‘सोशालिस्ट पार्टी’ने भारतीय वंशाचे अँटोनियो कोस्टा यांना उमेदवारी दिली आहे. मूळचे गोव्याचे असलेल्या कोस्टा यांना त्यांच्या साध्या राहणीमुळे ‘पोर्तुगालचे गांधी’ असे संबोधले जाते. सध्या ते लिस्बनचे लोकप्रिय महापौर आहेत. या पूर्वीच्या सोशालिस्ट सरकारमध्ये कोस्टा हे न्याय व अंतर्गत सुरक्षामंत्री होते. कोस्टा हे नोबेल विजेते लेखक रवींद्रनाथ टागोर यांच्यावर निबंध लिहिणाऱ्या ओरलँडो डा कोस्टा यांचे पुत्र आहेत. गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता असताना काही गौड सारस्वत ब्राह्मण कॅथॉलिक बनले, त्या हिंदू कुटुंबीयांच्या वंशजांपैकी कोस्टा आहेत. कोकणी भाषेत ते बाबुश म्हणजे मुलगा या नावाने प्रसिद्ध आहेत.
चिनी फटाक्यांच्या आयातीवर बंदी
चेन्नई: भारतीय बाजारपेठेत शिरकाव करू पाहणाऱ्या चिनी फटाक्यांमुळे धोका निर्माण झाल्याने त्याच्या बेकायदा आयातीवर र्निबध घालण्यात येणार आहे, असे केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केले. या संदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना आणि जाहिरात प्रसिद्ध केली असून, परदेशातून फटाक्यांची बेकायदा आयात केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.चीनमधून फटाक्याची आयात करण्याबाबत कोणताही परवाना नसतानाही बेकायदा आयात केली जात असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात सोमवारी रात्री वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडूतील फटका उद्योजकांची बैठक बोलाविली होती. चिनी फटाक्यांच्या वाढत्या विक्रीबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
अमेरिका-अफगाणिस्तान सैन्य करार
काबूल: येत्या वर्षांत अफगाणिस्तानात काही अमेरिकन सैनिक तैनात करण्यास परवानगी देणाऱ्या करारावर मंगळवारी अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यात स्वाक्षऱ्या झाल्या. माजी अध्यक्ष हमीद करझाई यांच्या काळात अमेरिकासोबतचे अफगाणिस्तानचे संबंध ताणले गेले होते. अफगाणिस्तानचे नवे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी दोन्ही देशांतील तणावाचे संबंध या कराराच्या माध्यमातून संपुष्टात आणले जात असल्याचे संकेत दिले आहेत.
सोमवारी अध्यक्ष म्हणून हमीद करझाई पायउतार झाले. करझाई यांनी आपल्या कार्यकाळात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला होता.
मुलीच्या पोटात ४ किलो केसांचा गोळा
लंडन: किर्गिझस्तानमधील डॉक्टरांनी एका किशोरवयीन मुलीच्या पोटातून ४ किलो वजनाचा केसांचा गोळा शस्त्रक्रियेने बाहेर काढला. ही मुलगी अठरा वर्षांची असून ती केस आणि लोकरही खात असे. किरगिझस्तानमधील बाटकेन प्रांतातील अयपेरी अलेकसीवा या मुलीला उपचारांसाठी येथे हलवण्यात आले होते, ती आजारी असल्याने तिला पाणीही पिता येत नव्हते. निर्जलीकरणामुळे ती मरण पावली असती. तिचे वजन कमी झाल्यानंतर तिला रुग्णालयात आणले होते. केसांमुळे तिच्या आतडय़ांना सूज आली होती. आता तिने पुन्हा कधीही केस न खाण्याचे आश्वासन दिले आहे.
हजसाठी सव्वा लाख भारतीय रवाना
जेद्दाह: सौदी अरेबियात सालाबादप्रमाणे होत असलेल्या हज यात्रेसाठी भारतातून  १,३६,०२० मुस्लीम यात्रेकरू दाखल झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. भारताचे महावाणिज्य दूत बी.एस. मुबारक यांनी सांगितले, की  १,३६,०२० मुस्लीम यात्रेकरू सौदी अरेबियात दाखल झाले आहेत. शेवटच्या विमानात मुंबईहून ३९४ यात्रेकरू आले आहेत. सोमवारी विमानाने येण्याचा अखेरचा दिवस होता. भाजपचे दोन वरिष्ठ नेते यंदा हज यात्रेत प्रतिनिधित्व करीत आहेत. भोपाळ येथील अरीफ बेग व पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष रशीद अन्सारी भारतीय यात्रेकरूंचे नेतृत्व करीत असून भारताचे राजदूत हमीद अली राव यांनी बेग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे स्वागत केले. २९ ऑगस्टला मुस्लीम यात्रेकरूंची ३३५ यात्रेकरूंची पहिली तुकडी मदिना येथे आली. शेवटची तुकडी सोमवारी दाखल झाली. हज यात्रेसाठी एकूण ३६५ उड्डाणे या वर्षी झाली आहेत.
भारताने सैन्य पाठवू नये- माकप
नवी दिल्ली: अमेरिकेच्या दबावाखाली भारताने इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या संघटनेविरुद्ध लढण्यासाठी सैन्य पाठवू नये असे माकपने म्हटले आहे. अमेरिकेच्या षड्यंत्रांना सरकारने बळी न पडता कुठल्याही परिस्थितीत तिथे सैन्य पाठवू नये, असे निवेदनात म्हटले आहे.