केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. नोएडातील मेघना श्रीवास्तव ही विद्यार्थिनी ४९९ गुण मिळवत देशात प्रथम आली आहे. तर ४९८ गुण मिळवत गाझियाबादमधील अनुष्का चंद्रा दुसरी आली आहे. तसेच लुधियानाच्या आस्था बांबा या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक मिळविला असून जयपूरची चाहत भारद्वाज आणि हरिद्वारची तनुजा कापरी यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून यंदाचा निकाल ८३.०१ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात एक टक्क्याने वाढ झाली आहे. मागच्या वर्षीचा निकाल ८२.०२ टक्के होता.

यावर्षी पाच मार्चपासून सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या होत्या. बारावीच्या परिक्षेला देशभरातून एकूण ११ लाख ८६ हजार ३०६ विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा ४ हजार १३८ केंद्रांवर घेण्यात आली होती. मात्र अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यामुळे सीबीएसईच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. हजारो विद्यार्थ्यांनी त्या विरोधात निदर्शने केली होती.

असा पहा CBSC चा निकाल

निकाल पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्टने विद्यार्थ्यांसाठी खास एसएमएस ऑर्गनायझर अॅप बनवले आहे. विद्यार्थी ऑफलाइन असतानाही या अॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकणार आहेत. या अॅपचा उपयोग करताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि जन्मतारीख टाकावी लागणार आहे. तसेच cbseresults.nic.in, cbse.nic.in and results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.