नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नीच्या सीडीआरचे प्रकरण

अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नीचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) मिळवण्याचा आरोप असलेल्या एका वकिलाच्या तपासात गुंतलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.

सरन्यायाधीश दीपक मिश्र व न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांना नोटीस जारी करून याप्रकरणी ४ आठवडय़ात त्यांचे उत्तर सादर करण्यास सांगितले.

सिद्दिकी यांना अटक करण्यात ठाणे पोलिसांनी ‘मगरूरपणे’ कारवाई केली आणि ‘कायद्याची योग्य ती प्रक्रिया’ राबवण्यात ते अपयशी ठरले, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाने २१ मार्चला या पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशीचा आदेश दिला होता. या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी व अ‍ॅड. निशांत काटनेश्वर यांनी केली.

नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नीचे सीडीआर बेकायदेशीररीत्या मिळवल्याबाबत ठाणे पोलिसांनी रिझवान सिद्दिकी यांना १६ मार्चला अटक केली होती. त्यांची तत्काळ सुटका करावी, असाही आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला होता.