समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आपले मत नोंदवले असून २०१४ मध्येही मुलायम सिंह यांनी अशीच इच्छा व्यक्त केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
मुलायम सिंह यांचे विधान मी ऐकले. ते २०१४ मध्येही असेच म्हणाले होते. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते,’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली. मुलायम सिंह यांनी २०१४ मध्ये मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत मनमोहन सिंग यांचे सरकार पडले होते.
Supriya Sule, NCP on Mulayam Singh Yadav's remark in Lok Sabha, 'I wish you (PM Modi) become PM again': I have heard that respected Mulayam Singh ji had said the same thing for Manmohan Singh ji in 2014. pic.twitter.com/ftsciHmOzU
— ANI (@ANI) February 13, 2019
तत्पूर्वी, मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत मोदींना दिलेल्या शुभेच्छा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. मुलायमसिंह यादव यांनी आधी मोदींना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, या सभागृहात उपस्थित असलेले सर्व सदस्य निवडून यावे, अशी प्रार्थना मी करतो. सध्या आमची (विरोधी बाकांवरील खासदारांची) संख्या कमी आहे. आणि तुम्हीच पुन्हा पंतप्रधान व्हावे, असे त्यांनी मोदींना सांगितले. यावर सभागृहातील खासदारांना हसू आवरता आले नाही. मोदींनीही हात जोडून यादव यांचे आभार मानले.
मोदींनी त्यांच्या कार्यकाळात सर्वांना घेऊन पुढे जाण्याचे प्रयत्न केले आणि यात त्यांना यशही आले, असे त्यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे कामकाज व्यवस्थित पार पडावे, यासाठी मेहनत घेतली आणि यासाठीच मी त्यांचा देखील आभारी आहे, असे मुलायमसिंहांनी सांगितले. विशेष म्हणजे मुलायमसिंह यादव मोदींचे कौतुक करत असताना त्यांच्या शेजारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या देखील बसल्या होत्या.