काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत गुरुवारी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केलेली वक्तव्ये आणि त्यात वापरलेले अपशब्द आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये झालेल्या भाषणात जनतेला सांगत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने लावलेली दुषणे हा गुजरात विधानसभा निवडणुकांमधला मोठा मुद्दा ठरतो आहे. त्याचवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेस पक्षाकडून मला अनेक दुषणे लावली जातात, शिव्या दिल्या जातात मात्र मी शांत बसतो कारण या लोकांची मानसिकताच ती आहे तर त्यांना काय उत्तर देणार? असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले आहे.

गुरूवारी पहिल्यांदाच मला ‘नीच’ असे म्हटले गेले. सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबही याआधी माझा उल्लेख असाच करत आले आहे. मी ‘नीच’ आहे कारण मी गरीब घरात जन्माला आलो. मी गुजराती आहे म्हणून मी नीच आहे का? मी गुजराती आहे म्हणूनच माझा तिरस्कार केला जातो? असेही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात विचारले.

काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हटले होते, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मनोरूग्ण आहेत.’ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी काय ट्विट केले होते माहित आहे ना? ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ### भक्त आणि भक्तांना #### बनवले’ हे ट्विट आठवते ना? याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

सोनिया गांधी यांनी मला ‘विषाची शेती करणारा माणूस’ असे म्हणत टीका केली होती. दिग्विजय सिंह म्हटले होते की मोदी सरकार ‘राक्षस राज्याप्रमाणे आहे.’ ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रावण आहेत.’ ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भस्मासूर आहेत’ असे जयराम रमेश यांनी म्हटले होते. बेनीप्रसाद वर्मा यांनी ‘कुत्रा’ म्हणत माझ्यावर ताशेरे झाडले. मनमोहन सिंह सरकारमध्ये मंत्री असलेले मनिष तिवारी यांनी माझी तुलना ‘अंडरवर्ल्ड डॉन दाऊद’सोबत केली होती. काँग्रेसचे बडे नेते प्रमोद तिवारी यांनी मला ‘हिटलर’, ‘गडाफी’ आणि ‘मुसोलिनी’च्या रांगेत नेऊन बसवले. काँग्रेसने मला शिव्या देण्याशिवाय काहीही केले नाही. मात्र मी शांत बसलो कारण माझे धोरण पूर्णतः वेगळे आहे.

काँग्रेसमधून तिकिट मिळालेला इमरान मसूद म्हटला होता की ‘मी नरेंद्र मोदींचे तुकडे करेन’, रेणुका चौधरींनी मला ‘व्हायरस’ म्हटले होते. गुजरातमधील काँग्रेसच्या नेत्यांनी मला काय काय म्हटले याचा उल्लेखही मला करायचा नाही. लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास काँग्रेसला बघवत नाही म्हणूनच काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरोधात इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका केली असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या शिव्यांचा पाढाच त्यांच्या भाषणात वाचला.

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरूद्ध भाजप असा दुरंगी सामना आहे. या निवडणुकांमध्ये आत्तापर्यंत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीकेचे ताशेरे ओढून झाले आहेत. मात्र मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेनंतर पंतप्रधानांनी सगळ्या काँग्रेस नेत्यांनी प्रचारादरम्यान काय काय म्हटले होते हे सांगत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच गुजरातच्या जनतेला काँग्रेसने प्रचारादरम्यान आपल्याविरोधात नेमके काय केले हे दाखवून दिले आहे.