पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : जुनाट व गंभीर आजार बरे करण्यासाठी आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वीची माहिती उपलब्ध आहे, पण हे प्राचीन ज्ञान व आधुनिकता यांची सांगड घालण्याचे प्रयत्न फारसे झाले नाहीत, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

आयुष मंत्रालयाच्या मार्फत गेली पाच  वर्षे प्राचीन संशोधन प्रयोगशाळांमध्ये तपासून त्याचा योग्य वापर करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे वैद्यकविज्ञानात मोठी भर पडत आहे असे सांगून ते म्हणाले की, जर आरोग्यव्यवस्था बदलायची असेल, तर त्यासाठी पारंपरिक व आधुनिक औषधांचा संगम साधावा लागेल. वेदांमध्ये अनेक आजार बरे करण्याचे उल्लेख आहेत, पण या प्राचीन संशोधनाची आधुनिकतेशी सांगड घालण्याचे प्रमाण कमी प्रमाणात झाले आहे.

योग पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या आरोग्यव्यवस्थेत आयुषला महत्त्वाचे स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून दीड लाख उपचार केंद्रे त्यासाठी उभारण्यात येत आहेत. याशिवाय १२ हजार आयुष केंद्रे सुरू करण्यात येणार असून त्यातील दहा हरयाणात आज सुरू होत आहेत. या वर्षी चार हजार केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट असून प्रत्येक गट स्तरावर एक केंद्र असेल.

पंचकुला, अंबाला, कैथल, कर्नाल, जिंद, हिसार, सोनीपत, गुरुग्राम, फरीदाबाद, नुह येथील अशा केंद्रांचे पंतप्रधान मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने उद्घाटन केले.

बारा हजार कोटींची बचत

आयुष्मान भारत योजनेत उपचार घेतल्याने लोकांचे १२ हजार कोटी रुपये वाचले आहेत. देशात ७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्य़ात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा उद्देश आहे. त्यातून एमबीबीएसच्या जागा १६ हजारांनी वाढणार आहेत.