सीमेवर जवान सुरक्षित नाहीत आणि गावात शेतकरीही सुखी नाहीत, अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाल्याची टीका विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. त्यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाच्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. सध्या देशात अशी परिस्थिती आहे की, सीमेवरचा जवान सुरक्षित नाही आणि गावातील शेतकरीही सुखी नाहीत. सीमेवर कोणी जवानांचा शिरच्छेद करतो आणि गावात शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळेनासा झालाय. पूर्वी एका क्विंटल मिरचीला १२ हजार रूपये मिळायचे. मात्र, आता तेवढ्याच मिरचीसाठी १५०० रूपये मिळताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. तूरडाळ आणि अन्य उत्पादनांच्याबाबतीतही तीच स्थिती आहे. जवळपास सर्वच पिकांच्या किंमती घसरल्या आहेत, असे तोगडिया यांनी म्हटले.

त्यासाठी मोदी सरकारने ठोस पावले उचलायला पाहिजेत. आता जवानांना सुरक्षित आणि शेतकऱ्यांना आनंदी ठेवायची वेळ आली आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीचे सडेतोड प्रत्युत्तर दिले पाहिजे. काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेच्या घटनेवरही तोगडिया यांनी भाष्य केले. या कृत्याचा बदला घेण्यासाठी ५० पाकिस्तानी जवानांची मुंडकी कापली पाहिजेत, असे तोगडिया यांनी सांगितले.

यापूर्वी भाजप खासदार विनय कटियार यांनीदेखील बाबरी मशिद प्रकरणावरून पक्षाला घरचा आहेर दिला होता. भाजपची सत्ता आल्यानंतर सीबीआय खाते हिंस्त्र श्वापदासारखं मोकाट सुटलंय , अशा शब्दात भाजपचे नेते विनय कटियार यांनी स्वपक्षावर तोंडसुख घेतले होते. बाबरी मस्जिद खटल्यात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग आणि अन्य जणांविरोधात नव्याने गुन्हेगारी आरोप दाखल करण्यात यावे, अशी विनंती सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात केली होती. या पार्श्वभूमीवर विनय कटियार यांनी सीबीआयने काही लोकांविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला.