प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘रॉक गार्डन’ची निर्मिती करणाऱ्या नेकचंद (वय ९०) यांचे येथील रूग्णालयात शुक्रवारी निधन झाले. त्यांनी टाकाऊ गोष्टींपासून शिल्पे तयार केली होती. स्थापत्य विशारद असलेले नेकचंद यांना गेल्या काही दिवसांपासून खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना काल सायंकाळी पीजीआयएमइआर संस्थेत हलवण्यात आले. तेथे त्यांचे मध्यरात्रीनंतर निधन झाले.
चंडीगड केंद्रशासित प्रशासनाने त्यांच्या निधनानंतर कार्यालयांना सुटी जाहीर केली. नेकचंदजी यांच्या निधनाने आम्ही सुटी जाहीर करीत आहोत. उद्या त्यांचे पार्थिव लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रॉक गार्डन येथे ठेवण्यात येईल, त्यांची कन्या परदेशातून येणार आहे व त्यानंतर उद्या सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे चंडिगडचे अतिरिक्त गृहसचिव एस.बी.दीपक कुमार यांनी सांगितले.
नेकचंद यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन गौरवले होते.पंजाबमध्ये १९५१ मध्ये ते रस्तेनिरीक्षक म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करीत होते. सुकना सरोवराच्या ठिकाणी बाग सजवली. रॉक गार्डनचे उद् घाटन १९७६ मध्ये झाले. हे गार्डन चाळीस एकर जागेत असून, अडीच लाख लोक त्याला दरवर्षी भेट देतात, त्याचे वार्षिक उत्पन्न १.८ कोटी आहे. नेकचंद यांच्या टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या कलाकृती वॉशिंग्टनच्या राष्ट्रीय बाल संग्रहालयात आहेत. त्यांची ४० शिल्पे ब्रिटनमध्ये वेस्ट ससेक्स येथे चिसेस्टरच्या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. नेकचंद यांचे पुत्र अनुज सैनी यांनी त्यांना रॉक गार्डन तयार करण्यात मदत केली होती.