नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी शनिवारी नेपाळच्या जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, आपल्या शुभेच्छांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले. कारण त्यांनी शुभेच्छा देणारं जे कार्ड पोस्ट केलं त्यात नेपाळच्या जुन्या नकाशाचा समावेश होता.

या कार्डवर नेपाळचं राष्ट्रीय चिन्ह, ओली यांचा फोटो आणि नेपाळचा नकाशा होता. मात्र, या नकाशात पिठोरागड जिल्ह्यातील कालापानी-लिपुलेख-लिमपियाधुरा हा भाग दाखवलेला नव्हता, भारताच्या या भागावर नेपाळने दावा केला आहे. भारतासोबत असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नेपाळने काही महिन्यांपूर्वी नवा नकाशा प्रसिद्ध केला होता. यामध्ये भारताच्या उत्तराखंडच्या या भागाचा समावेश होता. नेपाळने हा नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले गेले होते.

विजयादशमीच्या शुभेच्छांनंतर ओली यांना त्यांच्या विरोधकांकडून टीकेला सामोरं जावं लागलं. यावर नेपाळच्या सरकारनं स्पष्टीकरण दिलं की, पंतप्रधान ओली यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या कार्डवर छापलेला नकाशा हा तांत्रिक कारणामुळे चुकीचा छापला गेला. शुभेच्छांचं ग्रीटिंग कार्ड हे छोट्या साईजमध्ये असल्याने त्यामध्ये नवा भाग दाखवला गेला नाही, असं ओली यांचे सल्लागार सुर्या थापा यांनी सांगितलं.

ओली यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार राजन भट्टाराई म्हणाले, नेपाळने कालापाणी भागावरील आपला दावा सोडलेला नाही. पंतप्रधान ओली यांच्या नकाशातील चुकीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कारण, त्यांनी स्वतः सहा आठवड्यांपूर्वी शाळेची पुस्तकं मागं घ्यायला लावली होती आणि त्यात नव्या नकाशाचा समावेश करण्याचे आदेश दिले होते.

गेल्या महिन्यांत नेपाळ सरकारने त्यांच्या संविधान सुधारणा विधेयकात नव्या नकाशाचा समावेश केला होता. या भागातील जनगणना करण्याचा विचार असल्याचे नेपाळने म्हटलं होतं. दरम्यान, भारतानं हे स्पष्ट कंल होतं की, नेपाळने भारताच्या भागावर दावा केला असून त्यांना या भागात घुसखोरी करता येणार नाही.