प्रकाशाच्या नव्या स्वरूपाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यामुळे प्रकाशाचे मूलभूत स्वरूप समजण्यास मदत होणार आहे.
‘ट्रिनिटी कॉलेजच्या डय़ुब्लिन स्कूल ऑफ फिजिक्स’च्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. प्रकाशाच्या कणपुंजाच्या मोजता येण्यासारख्या लक्षणास कोनीय संवेग म्हणून ओळखले जाते. सर्व प्रकारच्या प्रकाशात कोनीय संवेग प्लान्क कॉन्स्टटच्या अनेक पटीत असतो, असे आतापर्यंत मानले जात होते. मात्र, नव्या संशाोधनानुसार प्रकाशाच्या नव्या स्वरूपातील प्रत्येक प्रकाशकणाचा कोनीय संवेग त्याच्या निमपट आहे. हा फरक छोटा असला तरी प्रकाशाच्या संशोधनात महत्त्वाचा असल्याचे संशोधकांनी सांगितले.
प्रकाशवर्तनात बदल करता येईल का आणि त्याचा कशा प्रकारे वापर करता येईल, याचा शोध घेणे औत्सुक्याचे आहे, असे सहाय्यक प्राध्यापक पॉल इस्थम यांनी सांगितले. प्रकाशलाटांचा अभ्यास करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होईल, असे प्राध्यापक जॉन डोनेगन यांनी म्हटले आहे. तर भौतिकशास्त्र आणि विज्ञान विश्वात या संशोधनाने मोलाची भर घातली आहे, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक स्टेफनो सॅन्वितो यांनी व्यक्त केली.