न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणाऱ्या एका दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. गोळीबार करणारा हा दहशतवादी ऑस्ट्रेलियाचा नागरीक आहे. ब्रेनटॉन टॅरॅन्ट असे या २८ वर्षीय दहशतवाद्याचे नाव आहे. उजव्या विचारसरणीला मानणारा हा दहशतवादी आहे. कट्टरपंथीय उजव्या विचारसरणीच्या दहशतवाद्याने केलेल्या या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो असे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणा या हल्ल्यासंबंधी तपास करीत आहेत. मॉरीसन यांनी बंदुकधाऱ्याबद्दल जास्त माहिती देण्यास नकार दिला. स्कॉट मॉरीसन यांनी हल्ल्याचा निषेध करतानाच न्यूझीलंडच्या जनतेबद्दल सहानुभूती व्यक्त केली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड फक्त सहकारी किंवा भागीदार नाहीत तर आम्ही एक कुटुंब आहोत असे मॉरीसन यांनी म्हटले आहे.

हल्लेखोरांनी ख्राईस्टचर्चच्या दोन मशिदींमध्ये गोळीबार केला. न्यूझीलंड पोलिसांनी या हल्ल्यासंबंधी तीन पुरुष एक महिला असे एकूण चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. मशिदींमध्ये करण्यात आलेल्या या अंदाधुंद गोळीबारात ४० जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.