करोनाच्या भीतीमुळे भोपाळमधील एका व्यक्तीवर नको ती नामुष्की ओढावली आहे. करोनामुळे नुकतंच लग्न झालेल्या एका व्यक्तीला जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयाला फेऱ्या तर माराव्या लागल्याच शिवाय त्याला स्वत:च्या पुरुषत्व सिद्ध करणारं प्रमाणपत्रही सरकारी अधिकाऱ्यांसमोर सादर करावं लागलं. झालं असं की करोनाच्या कालावधीमध्ये या व्यक्तीने आपल्या पत्नीपासून सुरक्षित अंतर ठेवलं होतं. करोनाची भीती असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या उद्देशाने त्याने पत्नीपासून दूर राहण्यास सुरुवात केली. मात्र पत्नीने याचा चुकीचा अर्थ घेत थेट जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली. आपल्या पतीच्या पुरुषत्वावर आपल्याला संशय असल्याचे या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे या व्यक्तीला पुरुषत्व सिद्ध करणाऱ्या काही वैद्यकीय चाचण्या करुन त्याचे अहवाल प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागले. हे अहवाल पाहिल्यानंतरच या महिलेने पतीसोबत सासरी जाण्यास होकार दिला.

दोन डिसेंबर रोजी शहरातील एका महिलेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार केली. या तक्रारीमध्ये माझा पती मला संतती सुख देण्यास असमर्थ आहे. सासरचे लोकही मला त्रास देत आहेत. त्यामुळे माझ्या पतीने मला महिन्याचा खर्च द्यावा अशी मागणी या महिलेने केली होती. पती फोनवर गोडगोड बोलतो मात्र तो आपल्याला त्याच्या जवळ येऊ देत नाही. मी यासंदर्भात माझ्या जवळच्या नातेवाईकांनाही सांगितलं. त्यांनी पतीशी यासंदर्भात चर्चा केली. मात्र काहाही घडलं नाही, असं या महिलेने तक्रारीत म्हटलं होतं.

नक्की काय घडलं?

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांचं लग्न २९ जून रोजी झालं. मात्र त्यानंतर काही दिवसांमध्येच दोघांमध्ये भांडण होऊ लागली. या सर्व गोष्टींना कंटाळून ही महिला माहेरी निघून गेली. त्यानंतर या महिलेने पती आणि सासरच्या लोकांविरोधात दोन डिसेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर या महिलेच्या पतीने प्राधिकरणाला दिलेल्या उत्तरामध्ये लग्नानंतर पत्नीच्या माहेरी अनेकजण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्याचे सांगितलं. पत्नीच्या घरचे सर्वजण पॉझिटिव्ह आल्याने पत्नीलाही करोनाचा संसर्ग झाल्याचं या व्यक्तीला वाटत होतं. त्यामुळेच आपल्याला पत्नीच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तो तिला जवळ येऊ देत नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सुरक्षित अंतर ठेवत होता.

 

 

…आणि प्राधिकरणाने आदेश दिले

मात्र पत्नीला हा दावा योग्य वाटला नाही. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहताच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने या व्यक्तीला पुरुषत्व सिद्ध करण्यासंदर्भातील चाचण्या करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही दिवसांनी या व्यक्तीने सर्व अपेक्षित आरोग्य चाचण्यांचे निकाल प्राधिकरणासमोर सादर केले. या चाचण्यांच्या निकालानुसार महिलेने केलेले आरोप खोटे ठरले. प्राधिकरणाने महिलेला पतीवर खोटे आरोप करु नयेत अशी समज देऊन, समोपदेशनाच्या माध्यमातून हे प्रकरण निकाली काढलं.

समोपदेशनामध्ये समोर आली धक्कादायक माहिती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, समोपदेशनादरम्यान पतीला करोना फोबिया म्हणजेच करोनाचा प्रचंड भीती होती असं निर्दर्शनास आलं. पत्नीने त्याच्यावर केलेले आरोप खोटे ठरले. आरोग्य चाचण्यांमध्ये तो ठणठणीत असल्याचं स्पष्ट झालं. समोपदेशनानंतर दोघांमधील गैरसमज दूर झाले आहेत.