मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह संस्थापक बिल गेट्स यांना रविवारी एका मुलाखतीमध्ये करोना विषाणूच्या साथीमुळे ही पुढील चार ते सहा महिन्यामध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक होईल अशी भीती व्यक्त केलीय. गेट्स यांची संस्था करोनाची लस विकसित करण्यासाठी आणि ती जगभरामध्ये उपलब्ध करुन देण्याची वितरण साखळी उभारण्यासाठी सध्या काम करत आहे. अमेरिकेमधील करोना संकटाची दिवसोंदिवस बिघडणारी परिस्थिती पाहून गेट्स यांनी हा इशारा दिला आहे.

बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष असणाऱ्या बिल गेट्स यांनी सीएनएनला एक विशेष मुलाखत दिली. यामध्ये बिल गेट्स यांनी, “या साथीच्या काळावधीचे पुढील चार ते सहा महिने परिस्थिती अंत्यत वाईट होऊ शकते. आयएचएमआय (इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मैट्रिक्स अँड एवेल्यूएशन) च्या अंदाजानुसार या कालावधीमध्ये करोनामुळे दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. आपण मास्क घातलं नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले तर मृत्यूचा हा आकडा नियंत्रणामध्ये आणू शकतो,” असं मत व्यक् केलं. मागील काही आठवड्यांमध्ये अमेरिकेत करोनाचा संसर्ग झाल्याचे, मृत्यूचे आणि रुग्णालयामधील अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. “ही परिस्थिती अमेरिका चांगल्या पद्धतीने हाताळेल असं मला वाटतं,” असं मतही बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे गेट्स यांनी करोनासारखी मोठी साथ येईल अशी भविष्यवाणी २०१५ मध्येच केली होती.

“जेव्हा मी २०१५ मध्ये भविष्यावाणी केली होती तेव्हा मी मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक असण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. त्यामुळेच हा विषाणू सध्या जितका घातक आहे त्याहून तो अधिक घातक आणि जिवघेणा होऊ शकतो. अजून आपण या साथीमधला अत्यंत वाईट काळ पाहिलेला नाही. मला सर्वाधिक आश्चर्य हे अमेरिका आणि जगभरातील देशांवर पडलेल्या आर्थिक प्रभावासंदर्भात वाटते. मी जो अंदाज पाच वर्षांपूर्वी व्यक्त केला होता. त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक परिणाम अर्थव्यवस्थांवर झाला,” असंही बिल गेट्स म्हणाले.

अमेरिकेत लसीकरणाची तयारी

अमेरिकेमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेल्याचे समते. देशातील अनेक राज्यांमध्ये फाइजरची लस पोहचवण्याचं काम वेगाने केलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील ऑप्रेशन वार्क स्पीडचे मुख्य अधिकारी गुस्टावे पेरना यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत १४५ ठिकाणी फाइजरची लस पोहचेल. मंगळवारपर्यंत ४२५ ठिकाणी तर बुधवारी इतर ६६ जागांवर ही लस पोहचवली जाईल असं सांगण्यात आलं आहे. ११ डिसेंबर रोजी फाइजरच्या लशीला आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्याची परवानगी देण्यात आलीय.