मणिपूरमध्ये सैन्याच्या १८ जवानांना ठार करणाऱ्या भीषण हल्ल्याला तीन महिने उलटल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या हत्यांसाठी कथितरीत्या जबाबदार असलेल्या एसएससीएन-के या बंडखोर नागा गटाचा प्रमुख एस. एस. खापलांग याच्याबाबत माहिती देणाऱ्यासाठी ७ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

यासोबतच, गेल्या ४ जून रोजी बंडखोरांच्या एका गटाचे नेतृत्व करून मणिपूरच्या चंदेल जिल्ह्य़ात सैनिकांवर हल्ला केल्याचा आरोप असलेला एनएससीएन-केच्या सशस्त्र विभागाचा स्वयंघोषित प्रमुख निकी सुमी याच्यासाठीही एनआयएने १० लाख रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. एस. एस. खापलांग हा एनएससीएन (के) गटाचा प्रमुख असून निकी सुमी हा या गटाच्या सशस्त्र विभागाचा कार्यभार पाहात आहे. २६ मार्च रोजी कोहिमातील गांधी स्टेडियमवर आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला करण्याच्या निर्णयाशी त्यांचा जवळचा सबंध होता, असे एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे.