कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून लोकसभेची निवडणूक लढविण्यास आपण तयार असल्याचे देशातील ‘आधार क्रमांक’ योजनेचे प्रमुख, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. नीलेकणी कॉंग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढविणार का, यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला.
राजकीय आघाडीवर काहीतरी करावे, असे मला वाटते आहे. त्यामुळे कॉंग्रेसने मला तिकीट दिले, तर मी नक्कीच निवडणूक लढवेन, असे नीलेकणी यांनी पत्रकारांना सांगितले. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यावर अजून चर्चा सुरू आहे. आपल्या योजनांना आणि कल्पनांना कॉंग्रेस पाठिंबा देत असल्यामुळेच आपण कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कॉंग्रेस नीलेकणी यांना बंगळुरू दक्षिणमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. १९७० पासून या मतदारसंघात कॉंग्रेस विजय मिळालेला नाही. भाजपचे नेते अनंतकुमार हे पाचवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.