महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून गोव्यात आलेल्या एकूण 9 पर्यटकांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. गोव्याच्या कळंगुट पोलिसांनी या 9 जणांना अटक केली असून दारु पिऊन धिंगाणा घातल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

समुद्रकिनारी, पार्किंग आणि फुटपाथवर दारु पिऊन गोंधळ घोलणाऱ्या आणि तेथील इतर पर्यटकांना त्रास देणाऱ्या व शांतता भंग करणाऱ्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे. पेट्रोलिंग करताना ते निदर्शनास आले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती कळंगुटचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.

यापूर्वी सप्टेंबर 2017 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास बंदी घालण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं म्हटलं होतं. याबाबतची अधिसुचना लवकरच काढली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं, मात्र अद्याप त्याबाबतची अधिसुचना काढण्यात आलेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने याबबातचं वृत्त दिलं आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोघे कोल्हापूरातील असल्याचं समजतंय, तर कर्नाटकातील चार जण आणि हैदराबादमधील तीन जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.