पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नीरव मोदीची कोठडी 27 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याला लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, त्याच्या वकीलांनी सशर्त जामीनासाठी अर्ज केला होता. पंरतु कोर्टाने तो फेटाळून लावला. वेस्टमिंस्टर कोर्टाच्या न्यायाधीश एम्मा अबर्थनॉट यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्यामुळे भारतीय बँकांना मोठे नुकसान सोसावे लागल्याचे सांगितले.

यापूर्वीही तीन वेळा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याने 8 मे रोजीही जामीनासाठी अर्ज केला होता. तसेच नीरव मोदीच्या वकिलांनी तो न्यायालयाच्या सर्व अटी मानण्यास तयार असल्याचेही न्यायालयाला सांगितले. सध्या नीरव मोदीची रवानगी साऊथ वेस्ट लंडनमधील वाँड्सवर्थ तुरूंगात करण्यात आली आहे. 16 मार्च रोजी सेंट्रल लंडनमधील मेट्रो बँकेच्या एका शाखेतून नीरव मोदीला अटक करण्यात आली होती.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी हमीपत्र (एलओयू) प्राप्त केले आणि परदेशात पीएनबीला हजारो कोटी रुपयांनी गंडवले. एवढेच नव्हेतर त्याने देशात अनेक बनावट कंपन्या तयार केल्या. बनावट संचालक दर्शवून बँकांना लुबाडले होते. हा घोटाळा सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा आहे. हा घोटाळा उघड होण्यापूर्वीच नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि त्यांचे कुटुंबीय देशाबाहेर पळाले होते. काही दिवसांपूर्वी लंडनमधील एका इंग्रजी वृत्तपत्राने नीरव मोदीचा शोध घेतला आणि नीरव मोदी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसला. नीरव मोदीने पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले होते.