जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचे विधेयक राज्यसभेनंतर मंगळवारी लोकसभेत देखील मंजूर झाले. यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यंमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या गाडीवरील जम्मू-काश्मीर राज्याचा झेंडा काढला. सरकारच्या निर्णयानंतर आता जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

यावेळी एएनआयशी बोलताना निर्मल सिंह यांनी म्हटले की, हा आमच्यासाठी फार मोठा दिवस आहे. आम्ही सरकारमध्ये आलो होतो तेव्हापासून हे दडपण बाळगत होतो. कारण, भाजपा एक घटना, एक झेंडा आणि एक पंतप्रधान मानणारा पक्ष आहे आणि ते फुटीरतावादाचे चिन्ह होते. मात्र, आता संसदेने विधेयक मंजूर केले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. अखेर आम्ही हे दडपण काढून टाकले.

या अगोदर जम्मू-काश्मीर राज्याचा स्वतंत्र झेंडा होता. तेथील शासकीय कार्यालयांमध्ये भारताच्या तिरंगा ध्वजाबरोबर जम्मू-काश्मीरचा झेंडा देखील लावलेला होता. मात्र आता कलम ३७० हटवण्यात आल्याने जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र झेंडा राहणार नाही, तिथे केवळ भारताचा तिरंगा ध्वजच फडकणार आहे.