बिहारमधील नितीशकुमार सरकारच्या काळात एका राज्य विद्यापीठाने समाजवादी विचारवंत राममनोहर लोहिया, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या विचारांवर आधारित साहित्य राज्यशास्त्रातून वगळले आहे.

याबाबत सरकारची नाराजी शिक्षणमंत्री विजयकुमार चौधरी यांनी गुरुवारी बोलून दाखवली असून सरण जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. चौधरी यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी याबाबतच्या बातम्या आल्यानंतर धक्काच बसला. त्यामुळे आपण अतिरिक्त मुख्य सचिव उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय अधिकारी यांना दूरध्वनी केला असता त्यांनी या प्रकाराची गंधवार्ताही नव्हती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा आपल्याला दूरध्वनी आला व त्यांनी अस्वस्थता व्यक्त केली.

मंत्र्यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला असे सांगण्यात आले की, २०१८ मध्ये नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रमात हे बदल करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ही समिती नेमण्यात आली होती. सरकारने यावर असे म्हटले आहे की, प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय विद्यापीठाने बदल करायला नको होते. समाजवाद हा भारतीय राजकारणाचा कणा आहे व बिहार ही त्याची प्रयोगशाळा आहे. जयप्रकाश नारायण हे भूमिपुत्र होते त्यांचे विचार वगळण्यात आल्याने मुख्यमंत्री संतप्त झाले आहेत.

दरम्यान, चौधरी यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा समावेश करण्यात आल्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. चौधरी यांनी म्हटले आहे की, कुठल्याही राजकीय विचारवंताचे विचार अभ्यासक्रमातून काढून टाकता कामा नये. कुणाचा समावेश केला तर त्याला आक्षेप असता कामा नये. हे प्रकरण आपण कुलपती फागू चौहान यांच्याकडे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इतर  विद्यापीठांमध्ये असे प्रकार झाले नसल्याची खात्री करून घेण्यात यावी, असे आदेश शिक्षण खात्यास देण्यात आल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.

लालूप्रसाद यांचा आरोप

मुख्यमंत्री नितीशकुमार व त्यांचे प्रतिस्पर्धी लालूप्रसाद यादव यांनी जेपी म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून १९७४ मध्ये राजकारणात बस्तान बसवले होते. लालूप्रसाद हे माजी मुख्यमंत्री असून त्यांनीच या बातमीचे कात्रण काढून ट्विटरवर टाकले होते. शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा आरोप यात करण्यात आला. भाजपसोबत सत्ता वाटून घेतल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप लालूप्रसाद यांनी केला होता.