बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे अत्यंत स्वार्थी असल्याची टीका भाजपाचे नेते गोपाळ नारायण सिंग यांनी केली आहे. भाजपाची देशात पुन्हा एकदा सत्ता आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरूवारी पार पडला. या शपथविधी सोहळ्याच्या काही वेळ आधीच रालोआतले मतभेद समोर आले. मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज झाले त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या याच निर्णयावर भाजपा नेते गोपाळ नारायण सिंग यांनी टीका केली आहे. नितीशकुमार हे अत्यंत स्वार्थी आहेत ते फक्त त्यांच्या फायद्याचा विचार करतात. त्याचप्रमाणे ते निर्णय घेतात किंवा बदलतात असेही गोपाळ नारायण सिंग यांनी म्हटलं आहे.

कॅबिनेट मंत्रिपदासाठी आमच्यासोबत असलेल्या इतर एकाही पक्षाने आग्रह धरला नाही. तरीही आम्ही जदयूला एक मंत्रिपद देऊ केले होते आणि ते त्यांनी नाकारले. नितीशकुमार यांच्या जदयूने जरी मंत्रिपद स्वीकारले नसले तरीही आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत आम्ही त्यांची साथ सोडणार नाही असे म्हणत वादावर पडदा टाकण्याच प्रयत्न केला. मात्र नितीशकुमार स्वार्थी आहेत अशी टीका आता भाजपा नेते गोपाळ नारायण सिंग यांनी ही टीका केली आहे.

नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपाने बिहारमध्ये प्रत्येकी १७ जागा लढवल्या. बिहारमध्ये जदयू-भाजपा आघाडीला ४० पैकी ३९ जागा मिळाल्या आहेत. लोकसभेता भाजपाचे ३०३ खासदार असून एनडीएचा आकडा ३५० च्या पुढे आहे. अशा स्थितीत भाजपाचं पारडं घटकपक्षांपेक्षा जड आहे. हे वास्तव लक्षात घेऊन नितीशकुमार यांनी पदरात पडत असलेलं मंत्रिपद स्वीकारण्याचा सूज्ञपणा दाखवायला हवा होता. मात्र तो त्यांनी दाखवला नाही. त्यांनी त्यांच्या स्वार्थाचा विचार केला असे गोपाळ नारायण सिंग यांनी म्हटले आहे.