गुजरात काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू असून आतापर्यंत सहा आमदारांनी पक्षाला रामराम केला आहे. अजून काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यात आता पक्षाच्या एका आमदारानं राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा विजय कठिण असल्याचा दावा केला आहे.

राज्यसभांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. त्याआधीच काँग्रेसला शंकरसिंह वाघेला यांच्या रुपानं मोठा धक्का बसला. त्यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर सहा आमदारांनीही विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत. या राजीनामासत्रामुळं राज्यसभेच्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा विजयी मार्ग खडतर असल्याचं सांगण्यात येतं. त्यात आता काँग्रेस आमदार राघवजी पटेल यांनीच अहमद पटेल यांचा विजय कठिण असल्याचा दावा केला आहे. राघवजी हे शंकरसिंह वाघेला यांचे समर्थक असल्याचं सांगण्यात येतं. सध्या ते राजीनामा देण्याच्या तयारीत असून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा विचार आहे.

राघवजी पटेल यांनी राज्यातील नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठींवरही निशाणा साधला आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्याला राज्य नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. आगामी काळात काँग्रेसचे आणखी २० आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांनी राजीनामे दिले तर अहमद पटेल या राज्यसभेवर निवडून जाणं अशक्य आहे, असंही त्यांनी सांगितलं. मी अलिकडेच अहमद पटेलांना भेटलो होतो. पक्षातील सध्याच्या परिस्थितीबाबत आपण त्यांना सावधही केलं होतं. तसंच राज्यसभेची निवडणूक लढवू नका, अशी विनंतीही केली होती, असं सांगून त्यांनी अहमद पटेल राज्यसभा निवडणूक जिंकूच शकत नाहीत, असा पुनरुच्चार केला.

सध्यातरी राज्यात दोनच मुख्य पक्ष आहेत. जर मी काँग्रेस सोडला तर माझ्याकडे भाजपत प्रवेश करणं हा एकमेव पर्याय आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मी आधीच याबाबत बोललो आहे. प्रदेशाध्यक्ष जितूभाई वाघानी यांच्याशीही यासंदर्भात बोलणं झालं आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छाही त्यांना बोलून दाखवली असल्याचं राघवजी पटेल यांनी सांगितलं. दरम्यान, काँग्रेसचे जामनगर येथील आमदार धर्मेंद्रसिंह जडेजा हेही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. तसे संकेत खुद्द जडेजा यांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.