हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे हिमस्खलनात दबलेल्या लष्कराच्या पाच जवानांना वाचवण्यासाठी गेल्या १० दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. २० फेब्रुवारी रोजी नामगया पोस्टहून जवळपास १६ जवान एका जलवाहिनीच्या कामासाठी शिपकीलाच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी अचानक हिमस्खलन होऊन त्यात सहा जवान गाढले गेले.

सहा जवानापैकी एका जवानाचा मृतदेह त्याच दिवशी मिळाला. अन्य पाच जवानांचा अद्याप शोध सुरूच आहे. येथे पडणाऱ्या बर्फामुळे शोधमोहिमेत अडचण निर्माण होत आहे. घटनास्थळी सैन्यदल, पोलिसांचे मिळून ३०० जणा त्यांचा शोध घेत आहेत. वातावरणात सतत बदल होत असल्यानं लष्कराला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

२० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. याच ठिकाणी इंडो-तिबेटियन दलाचे आणखी काही जवान गाडले गेले असावेत,अशी शक्यता व्यक्त केली आहे. हिमस्खलनात अडकलेले सर्व जवान जम्मू-काश्‍मीर रायफल्सचे असून, एका जवानाचा मृतदेह सापडला आहे. त्यांचे नाव रमेश कुमार (वय ४१) आहे. तसेच अन्य पाच जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, ते मरण पावल्याची भीती किन्नौरचे उपायुक्त गोपाल चंद यांनी व्यक्त केली आहे.