करोनाच्या संकटाचा हज यात्रेलाही फटका बसला आहे. जगभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सौदी अरेबियाने परदेशातील मुस्लीम भाविकांसाठी हज यात्रेसाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिमांसाठी यावर्षीची हज यात्रा रद्द झाली असून, यात्रेला जाण्यासाठी अर्ज केलेल्यांना सरकारकडून पूर्ण शुल्क परत केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिली.

करोनाच्या थैमानामुळे संपूर्ण जग कोलमडलं असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जागतिक स्तरावरील अनेक नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे. हज यात्रेलाही करोनाचा फटका बसला आहे. गर्दी टाळून हज यात्रा पार पडणार आहे.

सौदी अरेबियाच्या घोषणेनंतर केंद्र सरकारनं महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी याविषयी माहिती दिली. “यंदाच्या हज यात्रेसाठी भारतीय यात्रेकरून पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हज यात्रेला जाण्यासाठी देशभरातून २ लाख ३० हजार यात्रेकरूंनी अर्ज केले होते. अर्जवेळी भरण्यात आलेलं शुल्क कोणतीही कपात न करता केंद्र सरकार परत देणार आहे’, असं नक्वी यांनी सांगितलं.

हज यात्रेसंदर्भात सौदी अरेबियानं यात्रेसंदर्भात सोमवारी महत्त्वाची घोषणा केली होती. यात्रा रद्द न करता केवळ स्थानिक भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा होणार आहे. परदेशी असलेले मात्र, सध्या सौदी अरेबियात असलेल्या यात्रेकरूंना अटी शर्थींसह प्रवेश दिला जाणार आहे. ही यात्रेला जुलै महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणार आहे.