लडाखमधील चीनची घुसखोरी हा ‘स्थानिक प्रश्न’ असल्याच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यास तीव्र आक्षेप घेत सरकारच्या लेखी हा महत्त्वाचा मुद्दाच राहिला नसल्याची टीका भाजपचे नेते अरुण जेटली यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. यासंदर्भात सरकारने आपला नेमका इरादा काय आहे हे तरी स्पष्ट करावे, अशीही मागणी जेटली यांनी केली. दरम्यान, बंगळुरूसारख्या शहरात ‘प्रस्थापितांविरोधी लाट’ येण्याची धास्ती भाजपला वाटत आहे. या भागात विधानसभेच्या २८ जागा असून सत्तास्थापनेत या जागांचा कौल महत्त्वाचा मानला जातो.
चीनच्या घुसखोरीचा मुद्दा निकाली काढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे जेटली म्हणाले. त्यामध्ये व्यापारी स्तरावरील दबावापासून आंतरराष्ट्रीय दबावाचाही समावेश असू शकतो. आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला बचावात्मक पवित्रा घेता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. घुसखोरीच्या मुद्दय़ावर पंतप्रधानच अशी भूमिका घेतात तेव्हा ती चिंतेची बाब ठरते. उद्या ते येथे येतील तेव्हाही घुसखोरीचा मुद्दा ‘स्थानिक मुद्दा’ असल्याचे ते सांगतील. तेव्हा हे समाधानकारक उत्तर असणार नाही, असे मत जेटली यांनी मांडले.
दरम्यान, बंगळुरू शहरात विधानसभेचे २८ मतदारसंघ असून या मतदारसंघांमध्ये ‘प्रस्थापितांविरोधात लाट’ आल्यास आपले भवितव्य काय राहील, या भीतीने भाजपला ग्रासले आहे. २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत बी.एस.येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणुका लढविल्या तेव्हा पक्षाला सहानुभूतीच्या लाटेखाली १७ जागा काबीज करता आल्या होत्या. त्याआधी जनता दल (सेक्युलर) या पक्षाने कराराप्रमाणे भाजपच्या हाती सत्ता देण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे भाजपच्या बाजूने काहीशी सहानुभूतीची लाट आली होती. या वेळी असा काही मुद्दा नाही आणि येडियुरप्पा यांनीही गेल्याच वर्षी भाजपला रामराम ठोकून कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली आहे.
हे सर्व मुद्दे आपल्याला अनुकूल ठरणार नाहीत, या धास्तीने भाजपला घेरले असून त्याचा परिणाम बंगळुरूमधील निवडणुकीच्या यशावरही होईल, याची भाजपला धास्ती वाटत आहे.