News Flash

आता गोव्यात रात्री दहा नंतर ‘नो पार्टी!’

अंमली पदार्थांची विक्री वाढल्यानं गोवा सरकारचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

गोव्यात आता रात्री १० नंतर पार्टी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला या संदर्भातील माहिती दिली आहे. रात्री १० नंतर होणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विकले जातात, त्यामुळे अशा पार्ट्यांवर बंदी घालण्यासंदर्भात पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत एक बैठक पार पडली त्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी दिली आहे.

गोव्यात अंमली पदार्थ सर्रास विकले जातात, १८ वर्षे वयोगटाच्या खालील मुलांनाही हे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होतात. यावर कारवाई करण्यासाठी आम्ही तपास पथक नेमलं आहे, काही ड्रग माफियांवर कारवाई करण्यात आम्हाला यशही आलं आहे.  मात्र रात्री दहा नंतर होणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विकलं जाण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणूनच या पार्ट्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत असंही चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच दोन मुलांना ड्रग्ज विकले गेल्याचे प्रकार उघडकीला आले आहेत. म्युझिक पार्ट्यांमध्ये हे प्रमाण जास्त असतं म्हणूनच आम्ही हे निर्बंध लादले आहेत. गोवा हे पर्यटनाचं प्रमुख केंद्र आहे इथे विविध राज्यातून पर्यटक आणि मुलं-मुली येत असतात, या सगळ्यांना ड्रग्ज खुलेआम मिळू लागली तर अनर्थ ओढावेल, म्युझिक पार्ट्यांमध्ये आणि इतर प्रकारच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थ सहजपणे मिळू शकतात, त्यामुळे तरूण-तरूणी व्यसनाधीन होण्याची शक्यता बळावते.

केरळ, तामिळनाडू या राज्यांतून गोव्यात आलेल्या पर्यटकांकडे आणि विशेषतः तरूणांकडे ड्रग्ज आढळून आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या सगळ्या घटनांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यासोबत सविस्तर चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला असंही चंदन चौधरी यांनी म्हटलं आहे.

पोलीस दलातील काही भ्रष्ट पोलिसांमुळे गोव्यात ड्रग्जचा बेकायदेशी व्यापार फोफावला आहे अशी टीका शहर आणि नगरविकास मंत्री विजय सरदेसाई यांनी केली आहे. गोव्यात ड्रग माफिया वाढले आहेत, अनेक ड्रग माफिया अंमली पदार्थांचा व्यापार करून पैसे कमवत आहेत आणि त्यांना काही भ्रष्ट पोलिसांचीही साथ आहे असाही आरोप सरदेसाई यांनी केला आहे. ड्रग माफिया आणि भ्रष्ट पोलीस यांचे लागेबांधे शोधून त्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे. तर या प्रकारांना आळा बसू शकणार आहे. यासंदर्भात उपाय योजण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत असंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 9:13 pm

Web Title: no music party to be allowed in goa after 10 p m
टॅग : Goa
Next Stories
1 ‘आम्ही आधी मुस्लिम, मग भारतीय!’
2 ‘न्यू इंडिया’मध्ये गरिबीला कोणतेही स्थान नाही- राष्ट्रपती
3 ‘बीटिंग रिट्रीट’चा जल्लोष : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वाघा-अटारी सीमेवर उत्साहाचे वातावरण
Just Now!
X