भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने आता शाकाहाराची वाट धरली आहे. येत्या १ जानेवारी पासून ६१ ते ९० मिनिटांच्या देशांतर्गत विमान प्रवासामध्ये फक्त शाकाहारी अन्नपदार्थ देण्याचा निर्णय एअर इंडिया प्रशासनाने घेतला आहे.
एअर इंडिया प्रशासनातर्फे २३ डिसेंबरला एक परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार, १ जानेवारीपासून एयर इंडियाच्या देशांतर्गत  उड्डाण करणा-या विमानांच्या इकॉनॉमी क्लासमध्ये गरम शाकाहारी जेवण देण्यात येईल. तसेच, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात प्रवाशांना चहा किंवा कॉफी यापुढे देण्यात येणार नाही. या परिपत्रकावर एअर इंडियाचे महाव्यवस्थापक डी. एक्स.पेस यांची स्वाक्षरी असून केबिन सदस्यांना याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
६० ते ९० मिनिटांच्या कालावधीच्या फ्लाईटमध्ये जवळपास १५०पेक्षा जास्त प्रवासी असतात. या सर्व प्रवाशांना भोजन देण्यासाठी फक्त दोनचं केबिन सदस्य असल्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना भोजन देणे सोयीस्कर होत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे एका अधिका-याने सांगितले.
यापूर्वी, एअर इंडियाच्या देशांतर्ग उड्डाणांमध्ये सॅण्डविच (शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही) आणि केक दिले जात असत. मात्र, आता याची जागा शाकाहारी पदार्थ घेणार आहेत.