दिल्लीत करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होते आहे. मात्र चिंतेचं काहीही कारण नाही. कारण वैद्यकीयदृष्ट्या सगळी काळजी आम्ही घेतो आहोत असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. आम्ही आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतो आहोत. जर दिल्लीतल्या कोणत्याही कुटुंबात कुणाला करोनाची लागण झाली तर सगळ्या प्रकारची वैद्यकीय सेवा आम्ही त्यांना पुरवू असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. सध्याच्या घडीला दिल्लीत ४१०० बेड्स सज्ज आहेत. काही लोक खाटा कमी पडत आहेत अशी तक्रार करत आहेत मात्र तशी परिस्थिती दिल्लीत नाही असंही केजरीवाल यांनी सांगितलं.

दिल्लीतला हेल्पलाइन क्रमांक १०३१ असा आहे. ज्या नागरिकांना काहीही माहिती हवी असेल तर त्यांनी त्यांनी या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. त्यांना दिल्लीतल्या कोणत्या रुग्णालयात काय व्यवस्था आहे, किती बेड्स उपलब्ध आहेत याची माहिती मिळेल असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. सध्याच्या घडीला दिल्लीत ३०२ व्हेंटिलेटर्सही उपलब्ध आहेत. ज्यापैकी २१० रिक्त आहेत. दिल्ली सरकार या अॅपवर ही सगळी माहिती अपडेट करण्यात आली आहे असंही केजरीवाल यांनी सांगितलं.